थकीत देणी मिळावी या मागणीकडे दुर्लक्ष करतानाच कामगार वसाहतीतला वीजपुरवठा खंडित करण्याच्या रावळगाव साखर कारखाना व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध कामगारांनी चार दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. परंतु या आंदोलनाची दखल व्यवस्थापन घेत नसल्याने यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कामगार संघटनेने दिला आहे.
कारखान्यात कायमस्वरूपी ७० आणि हंगामी ६० असे कामगार आहेत. कारखान्याच्या जागेतील वसाहतीमध्ये या कामगारांचे वास्तव्य आहे. गळीत हंगाम संपल्यानंतर कामगारांनी कारखान्याकडे थकीत रक्कम मिळावी म्हणून पाठपुरावा सुरू केला असता ही देणी व्यवस्थापनाने दिली नाहीतच, परंतु २२ फेब्रुवारीपासून वसाहतीतील वीजपुरवठाही खंडित केला आहे. केवळ रात्री आठ ते १० या दोन तासांच्या कालावधीतच तेथील वीजपुरवठा सुरू असतो. वीजपुरवठा खंडित करण्याच्या या धोरणामुळे कामगारांच्या कुटुंबीयांची गैरसोय होत आहे. सध्याचा काळ हा परीक्षेचा असल्याने शासनाने भारनियमन रद्द केले असताना कारखाना व्यवस्थापनाच्या दिवसभरात केवळ दोन तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याच्या कृतीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची कामगारांची तक्रार आहे. कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना हेतुपुरस्सर त्रास देण्याच्या हेतूने वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
कामगारांचे कारखान्याकडे जानेवारीपासून वेतन थकीत आहे. तसेच जादा कामाचा मोबदला, फरक, सेवानिवृत्त कामगारांचा बोनस ही येणी बाकी आहेत. ही सर्व रक्कम मिळावी तसेच वीजपुरवठा खंडित करण्याच्या कृतीसंदर्भात कामगारांनी अपर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे आपली कैफियत मांडली. त्यानंतर कामगार आयुक्तांकडे यासंदर्भात बैठक घेण्यात आली, परंतु ही बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे ७  मार्चपासून कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. चार दिवस झाल्यावरही या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने कामगारांमध्ये असंतोष वाढीस लागला आहे. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेचे महासचिव पी. डी. अमृतकर, उपाध्यक्ष संजय भामरे, भिला जगताप, साहेबराव पाटील आदींनी दिला आहे.