कल्याण पूर्वमधील अनेक भागांत गेल्या अनेक महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याने जल वाहिन्यांमधून घरात गटारातील, मलनिस्सारण वाहिन्यांमधील गढूळ, किडेमिश्रित पाणी वाहून येत आहे. कल्याण पूर्व भागातील साडेतीन लाखांहून अधिक लोकवस्ती असलेल्या भागाला ६५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात ४० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत आहे. अहोरात्र पाणी पुरवठा करण्याचे पालिका प्रशासनाचे आश्वासन हवेत विरले असल्याची टीका कल्याण पूर्व भागातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली.
कल्याण पूर्व भागातील पाणीटंचाईबाबत नगरसेविका माधुरी काळे, नगरसेवक नीलेश शिंदे यांनी लक्षवेधी सूचना सभेत मांडली होती. महापौर कल्याणी पाटील कल्याण पूर्व भागात राहतात. पूर्व भागातील नागरिकांना पाणी पिण्यास मिळत नाही. तरीही कल्याणी पाटील यांनी हा महत्त्वाचा विषय सभेत मांडण्यास सुरुवातीला नकार दिला. मात्र माधुरी काळे, नीलेश शिंदे, सचिन पोटे, नरेंद्र गुप्ते, शरद गंभीरराव, वैशाली दरेकर, मनोज घरत, मंदार हळबे, विश्वनाथ राणे यांनी पाण्याचा गंभीर विषय चर्चेला घेतलाच पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली. अखेर दुसऱ्या दिवशीच्या सभेत हा विषय चर्चेला घेण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. ‘कल्याण पूर्वमध्ये पालिकेचे २५ प्रभाग आहेत. अनेक भागांत गेली साडेचार वर्षे तीव्र पाणीटंचाई आहे.  नेतिवली, मोहिली पाणी योजना पूर्ण झाल्यानंतर कल्याण पूर्व भागाला ६८ दशलक्ष पाणीपुरवठा होईल असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. या योजना पूर्ण झाल्या तरी कल्याण पूर्व भागातील पाणीटंचाईचे संकट दूर का होत नाही, असे प्रश्न माधुरी काळे यांनी केले. नीलेश शिंदे यांनी सांगितले, सामान्य नागरिकांपेक्षा पालिकेच्या अभियंत्यांना भव्य गृह संकुलांमध्ये राहणाऱ्या धनाढय़ विकासकांच्या संकुलांना मुबलक पाणी पुरवठा कसा होईल याची चिंता असते. कल्याण पूर्वेला होणाऱ्या पाणी पुरवठा जलवाहिन्यांवर गोदरेज हिल, सुभाष मैदान, गोविंदवाडी भागात अनेक अनधिकृत नळजोडण्या घेतल्या आहेत. येथे विभागवार पाणी पुरवठा पद्धती पाणी विभागाकडून केली जात नाही, अशी टीका नीलेश शिंदे यांनी केली.  बांधण्यात आलेल्या जलकुंभांमधून टँकर चालक पाणी भरीत आहेत. हे पाणी वितरित केले तर पाण्याची समस्या सुटेल. प्रशासन हेतुपुरस्सर कल्याण पूर्वला सापत्न वागणूक देत आहे, असे नगरसेवक सचिन पोटे यांनी सांगितले.  नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांनी केली. प्रकाश पेणकर, विश्वनाथ राणे यांनीही प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे पाणीटंचाई होत असल्याची टीका केली.
पालिका प्रशासनाने कल्याण पूर्व भागातील जुन्या वितरण वाहिन्या काढून तेथे वाहिन्या टाकण्यासाठी प्रयत्न केले जातील. अनधिकृत वाहिन्या काढून टाकल्या जातील. विजेच्या लपंडावाचा हा परिणाम असल्याचे स्पष्ट केले. विभागवार पाणी वाटप पद्धती, जलकुंभाद्वारे पाणी पुरवठा करून बायपास पद्धत करणे या योजनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले. महापौर कल्याणी पाटील यांनी वितरण व्यवस्थेत बदल करणे, गटार, मल वाहिन्यांमधून गेलेल्या वाहिन्या बदलण्याचे आदेश प्रशासनाला दिले.