सिडको वसाहतींचे हक्काचे पाणी पनवेल शहराला वळवल्याने कळंबोली आणि नवीन पनवेल या दोन सिडको वसाहतींमधील रहिवाशांवर पाणी संकट ओढवले आहे.
पनवेल नगर परिषदेच्या मालकीचे देहरंग धरणाचे पाणी उन्हाळ्यात आटले आहे तर सिडको वसाहतींना पाण्याचा पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाण्याची पातळी कमी झाल्याने वसाहतींना कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे सिडकोच्या वतीने पनवेल नगर परिषदेला पाणी मदतीचे धोरण अवलंबले आहे. तेथे सिडकोच्या वतीने सहा एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. त्याचा परिणाम कळंबोली आणि नवीन पनवेल येथील सिडको वसाहतींवर झाला आहे. सध्या कळंबोलीची तहान भागविण्यासाठी २९ एमएलडी व नवीन पनवेल वसाहतींसाठी आवश्यक ४८ एमएलडी पाण्यापैकी कळंबोली व नवीन पनवेल वसाहतींना प्रत्येकी सात एमएलडी पाण्याची टंचाई भासत आहे. पाणीटंचाईचा फटका वसाहतीमधील नवीन जलजोडण्यांना बसला आहे.
नवीन पनवेल येथील सुकापूर आदई सर्कल परिसरातील इमारतींमध्ये रहिवाशांना आणि कळंबोली येथील रोडपाली नोडच्या रहिवाशांना या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. रहिवाशांना दिवसातून तासभर पाणी मिळत आहे. सिडको वसाहतींमधील नवीन इमारतींमध्ये ५० लाख रुपये खर्चून सदनिका घेतलेल्या रहिवाशांनी सिडकोच्या या अनियोजित पाणीवाटप धोरणाबद्दल संताप व्यक्त केला आहे.

सिडको वसाहतींचा पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी सिडकोने बाणगंगा धरणाचा सहयोग घेतला आहे. यासाठी सुमारे १४०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या धरणाचे काम सुरू असून येत्या तीन वर्षांत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर या धरणातून पाणीपुरवठा करणे शक्य होईल.
-मोहन निनावे, (सिडको – प्रवक्ता)