उरणमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे एमआयडीसीने सतर्कता म्हणून तालुक्यातील पाणीकपातीला सुरुवात केली आहे. यात आठवडय़ातून केवळ शुक्रवारी बंद असणारा पाणीपुरवठा यापुढे मंगळवारीही बंद करण्यात येणार आहे. तालुक्यातील २५ ग्रामपंचायती, उरण शहर तसेच वाडे व ओएनजीसी, जेएनपीटीवर आधारित गोदामे तसेच खाजगी उद्योगांना उरणच्या रानसई धरणातून पाणीपुरवठा होत असतो. रानसई धरणाची उंची ११६ फूट आहे. त्याची पाणी साठवण क्षमता दहा दशलक्ष घनमीटरची आहे. गेल्या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने ही पातळी ९७.४ फुटांवर आली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात होणारा पाऊसही न झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. सतर्कता म्हणून पाणीकपातीचा हा निर्णय घ्यावा लागला आहे, अशी माहिती उरण एमआयडीसीचे उपअभियंता एम. के. बोधे यांनी दिली.