सध्या पालिकेकडून पाणी पुरवठा होणारे शहरातील आठ हजार ग्राहक १ जानेवारीपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व शहरात जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा होईल. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीतील वार्षिक तीन कोटी रूपयांची बचत होऊन २२ अधिकारी आणि कर्मचारी अन्य कामांसाठी उपलब्ध होणार आहेत.नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी मंगळवारी यासंदर्भात शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्याधिकारी राजेश कानडे, उप अभियंता हिंदुराव पाटील, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजयसिंग, पाणी पुरवठा सभापती स्वप्नील बागुल आदी या बैठकीस उपस्थित होते.सध्या अंबरनाथ शहरातील ७५ टक्के पाणी जीवन प्राधिकरण तर २५ टक्के पाणी पालिका प्रशासनाकडून पुरविले जाते. पाणी पुरवठा व वसुली कामात सुसूत्रता यावी, या हेतूने पालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये झालेल्या ठरावांनुसार हा निर्णय घेण्यात आला. सध्या पालिका आठ हजार ग्राहकांसाठी एमआयडीसी, जीवन प्राधिकरण तसेच स्वत:च्या मालकीच्या चिखलोली धरणातून पाणी घेते. महिन्याभरात हे ग्राहक जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात येणार आहेत.