पनवेल नगर परिषदेने २०१५-१६ या आर्थिक वर्षांच्या तरतुदीसाठी १२० कोटी रुपयांच्या उलाढालीचा अर्थसंकल्प सादर केला, मात्र यामध्ये सामान्य पनवेलकरांची पाणीपट्टीत वर्षांला साडेचारशे रुपयांनी वाढ केल्याने हा अर्थसंकल्प सामान्यांच्या मुळावर उठणारा ठरला आहे. सभागृहाच्या स्थायी समितीने या अर्थसकल्पाला मंजुरी दिल्यामुळे सभागृहामधील विरोधी बाकावर बसणाऱ्या सदस्यांनी ही वाढ मागे घेण्याच्या केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून सुमारे ५० टक्केपाणीपट्टी वाढीचा भरुदड पनवेलकरांना सोसावा लागणार आहे. यामुळे पनवेलचे ८ हजार १५५ निवासी पाणीपट्टी भरणाऱ्या सामान्य कुटुंबीयांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. सामान्य पनवेलकरांच्या खिशाला या अर्थसंकल्पामुळे ही वाढ एप्रिल महिन्यापासून भरण्याची तरतूद करावी लागणार आहे.
नगर परिषदेमधील अधिकाऱ्यांची कोणते विभाग कोणत्या अधिकाऱ्यांकडे शिल्लक आहेत याचीही माहिती अजूनपर्यंत न दिल्याने नगर परिषदेचा वेळकाढूपणा समोर आला. काही सदस्यांनी हा अर्थसंकल्प जुन्या बाटलीतील नवी दारू असे बोलून तर काहींनी हा अर्थसंकल्प आकडय़ांचा फुगा असल्याचे सांगितले. या अर्थसंकल्पादरम्यान मलेरिया निर्मूलनासाठी एक कोटी रुपये खर्चाच्या आकडय़ाने सर्वाचे लक्ष्य वेधून घेतले. तसेच पन्नास लाखांच्या जंतुनाशकांनी सर्व सदस्यांना बोलते केले. खरेच एवढा खर्च होतो का, असा प्रश्न पनवेलकरांसहित अनेक सदस्यांना पडला आहे. सदस्य प्रकाश बिनेदार यांनी अर्थसंकल्प सादर करणाऱ्यांना दोन शून्य गायब झाल्याचे दाखवून दिले. देहरंग धरणाच्या उंचीसाठी लिहिले होते १० लाख रुपये, मात्र प्रत्यक्ष तरतूद एक कोटींची होती, कॉपी पेस्टच्या या लढाईत आकडेवारीची छापखान्यातील चूक येथे दाखवून देण्यात आली.  सर्वसाधारण सभा व निर्णय घेण्याची चालढकलपणा येथे विरोधक व सत्तारूढ सदस्यांनी नगराध्यक्ष चारुशीला घरत, मुख्याधिकारी मंगेश चितळे यांना दाखवून दिला. एकीकडे १२० कोटी ६३ लाख ४० हजार २७८ रुपयांच्या या अर्थसंकल्पामध्ये अपंगाचे पुनर्वसन, महिलांच्या प्रोत्साहन व पुनर्वसनासाठी विविध योजना राबविण्यासाठी तरतूद असावी, अशीही मागणी करण्यात आली. मुख्याधिकाऱ्यांच्या प्रशासकीय इमारतीला सुरक्षेसाठी दहा लाख रुपयांप्रमाणे शहरातील पुतळ्यांच्या सुरक्षा व देखभालीसाठी तेवढीत तरतूद करण्याची मागणी येथे करण्यात आली. या वेळी देहरंग धरणामधील गाळ काढण्याचा विषय वर्षांनुवर्षे चगळला गेला. ठोस असे काही नसलेल्या अर्थसंकल्पामध्ये पार्किंग धोरण ठरल्याने यापुढे पनवेलच्या मोकळ्या जागेवर पार्किंग करताना शुल्क भरावे लागणार हेच पनवेलकरांसाठी वास्तव आहे.