कल्याण-डोंबिवली पालिकेने २५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा योजनेसाठी घेतलेल्या ९ कोटी ५५ लाख रुपयांच्या कर्जातील रकमेचे हप्ते थकविल्याने मूळ रकमेसह थकीत कर्जाची रक्कम १७ कोटी २५ लाख ६६ हजार १६२ रुपये झाली आहे. जीवन प्राधिकरणाकडून पालिकेला वारंवार नोटिसा पाठवूनही थकीत रक्कम भरणा करण्यात येत नसल्याचे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले. अलीकडेच पालिकेला थकीत कर्जाऊ रक्कम भरण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील सहा शहरे आणि १०४ खेडय़ांचा पाणीपुरवठा व जलनिस्सारण योजना सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जागतिक बँकेकडून ६९९ कोटीचे कर्ज घेतले आहे. या कर्जाऊ रकमेतून कल्याण-डोंबिवली पालिकेने शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी ९ कोटी ५५ लाख रुपयांचे कर्ज २५ वर्षांपूर्वी घेतले आहे. या कर्जाऊ रकमेचे अधेमधे हप्ते फेडण्याचा प्रयत्न पालिकेने केला.
मात्र पूर्ण रक्कम भरण्यात टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे मुद्दल, व्याज आणि दंडाची रक्कम मिळून कर्जाची एकूण थकीत रक्कम १७ कोटी २५ लाखांच्या घरात गेली आहे. थकीत रकमेत मुद्दल ५ कोटी ४९ लाख, व्याज २ कोटी ४७ लाख, दंडनीय व्याज ९ कोटी २८ लाख रुपये आहे. या रकमेचा वेळेत भरणा केला नाही तर या पुढील काळात शासनाकडून पालिकेतील योजनांसाठी हमी मिळणार नाही. ही रक्कम वसुलीसाठी शासनाकडून कठोर उपाययोजना करण्यात येईल. जमीन महसूल थकबाकी म्हणून वसुलीची कारवाई करण्यात येईल, असे प्राधिकरणाच्या कर्ज विभागाच्या लेखा अधिकारी योगिता देवकुळे यांनी म्हटले आहे.  योगिता देवकुळे यांनी सांगितले, कल्याण-डोंबिवली पालिकेने १९९२ ते १९९३ पर्यंत रीतसर कर्जाचे हप्ते भरले आहेत. त्यानंतर त्यांनी अधूनमधून विविध बँकांच्या माध्यमातून हप्ते भरले आहेत. काही वेळा पालिकेला मिळणाऱ्या शासकीय निधीतून प्राधिकरणाने वसूल केली आहे. वारंवार पालिकेला नोटीस पाठवण्यात येते. त्याची गंभीर दखल प्रशासनाकडून घेण्यात येत नाही. कल्याण-डोंबिवली पालिका विविध वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जापोटी सुमारे १० ते १५ कोटी रुपयांच्या कर्जाचे हप्ते आता फेडते. विविध नागरी सुविधांसाठी पालिका कर्ज उचलत असल्याने येणाऱ्या पाच ते दहा वर्षांत कर्जाऊ रकमेचे हप्ते फेडण्याची रक्कम सुमारे ३० ते ३५ कोटी रुपयांपर्यंत जाईल, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.  पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी याबाबत आपणास काही माहिती नाही, पण लेखा विभागाकडून याबाबत माहिती मिळेल असे सांगितले. लेखा विभागातील अधिकाऱ्याने अशा प्रकारची थकबाकी असल्याची व ती भरण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगितले.