मुंबई महानगर प्रदेशाच्या परिघावरील एके काळी मुबलक पाणीपुरवठय़ासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बदलापूर शहरातील अनेक विभागांमध्ये सध्या पाणीटंचाई भेडसावत आहे. सदोष तसेच अपुरी वितरण व्यवस्था आणि वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे बदलापूरकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यंदा तर बदलापूरकरांना पाण्यासाठी पावसाळ्यात मोर्चा काढावा लागला होता. अंबरनाथ तसेच बदलापूर शहरांतील एकूण पाणीपुरवठय़ापैकी ३० ते ४० टक्के पाणी गळतीमुळे वाया जाते. शासनाच्या नियोजनशून्य धोरणामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी वेळीच उपाययोजना करण्यात आली नाही, तर शहरात पाणीबाणी होण्याची भीती येथील जाणकार नागरिक व्यक्त करीत आहे.
 महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या बदलापूर शहरात प्रतिदिन ३५ ते ३७ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो. त्यापैकी २५ ते २७ टक्के पाणी गळतीमुळे वाया जाते. नव्या वितरण व्यवस्था कार्यान्वित झाल्यानंतर गळतीचे प्रमाण दहा टक्केइतके कमी करणे शक्य आहे. मात्र नवे जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ तसेच वाहिन्या टाकण्यासाठी प्रस्तावित ८१ कोटी रुपयांची योजना शासनदरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. जुलै महिन्यात बदलापूरच्या या पाणीयोजनेबाबत मंत्रालयात बैठक होती. मात्र त्याच्या आदल्या दिवशीच मंत्रालयास आग लागली. त्यामुळे पाणीपुरवठय़ाची ही योजना बारगळली. आता ती बैठक येत्या आठवडय़ात होणे अपेक्षित आहे. या योजनेत प्रत्येकी २४ आणि ५ दशलक्ष लिटर्स पाणी क्षमतेची दोन जलशुद्धीकरण केंद्रे, आठ जलकुंभ आणि वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. मात्र हे सर्व अद्याप कागदावर आहे. त्याला किती वेळा लागेल, हे सांगता येणार आहे. पूर्व विभागातील म्हाडा कॉलनीतील जलकुंभ वाहिन्यांचे काम पूर्ण होऊन पुढील महिन्यात कार्यान्वित होईल. त्यामुळे महिनाभरात बदलापूरकरांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकणार आहे.    

* २४ बाय ७ ते २४ तास बंद
बदलापूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर काही प्रभागांमध्ये २४ बाय ७ पाणी योजना राबविण्यात आली होती. सध्या पाणीटंचाईमुळे हा प्रयोग बंद करावा लागलाच, शिवाय आठवडय़ातून एक दिवस २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवावा लागतो. त्यानंतरच्या दिवशीही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने प्रत्यक्षात दोन दिवस शहरात पाण्याची बोंब असते.    

* भविष्याची तरतूद
सध्या उल्हास नदीतून अंबरनाथ, बदलापूर तसेच ऑर्डनन्स विभागासाठी ९० दशलक्ष लिटर्स पाण्याचे आरक्षण आहे. बारवी धरण विस्तारीकरण योजना मार्गी लागल्यानंतर तिथे उपलब्ध जलसाठा कल्याण-डोंबिवली शहरांना पुरवला जाईल. त्यामुळे अंबरनाथ-बदलापूरसाठी उल्हास नदीतून अतिरिक्त ९० दशलक्ष लिटर्स पाणी उचलण्याची परवानगी मिळण्याविषयीचा प्रस्ताव जीवन प्राधिकरणाने शासनाकडे पाठविला आहे. तसेच पाटबंधारे विभागाच्या ताब्यात असणाऱ्या भोज धरणातून बदलापूरसाठी प्रतिदिन ५ ते ७ दशलक्ष लिटर्स पाणी मिळावे, असाही प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.