इरई, झरपट व वर्धा या तीन प्रमुख नद्यांचे पात्र वेकोलिच्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे कमी झाल्याने यावर्षी नदी काठावरील गावकऱ्यांना पाणीटंचाईची तीव्र झळ सोसावी लागणार आहे, तसेच बहुतांश गावकऱ्यांना दूषित पाणी प्यावे लागणार आहे.
या जिल्ह्यात वेकोलिच्या २७ व कर्नाटक एम्टा व सनफ्लॅग या खासगी कंपन्यांची प्रत्येकी एक, अशा एकूण २९ कोळसा खाणी आहेत. खुल्या व भूमिगत खाणीतून कोळसा काढल्यानंतर तेथील माती जवळच टाकली जाते. आज चंद्रपूर, भद्रावती, घुग्घुस, बल्लारपूर, राजुरा व चिमूर या शहराच्या सभोवताल वेकोलिच्या या मातीचे उंचच उंच ढिगारे तयार झाले आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील बहुतांश गावांना पुराचा वेढा पडतो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी वेकोलि व्यवस्थापनाला पत्र लिहून या ढिगाऱ्यांची विल्हेवाट लावण्याचे निर्देश दिले होते, परंतु त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने वारंवार नोटीस दिल्यानंतर लाजेखातर सामाजिक दायित्व निधीतून केवळ २ कोटीचा निधी नदी स्वच्छतेसाठी दिला. मात्र, हा निधी अतिशय अपुरा आहे. दरम्यान, वेकोलिच्या या ढिगाऱ्यांमुळे वर्धा, इरई व झरपट या तीन प्रमुख नद्यांचे पात्र निमूळते झाले आहे. त्याचा परिणाम या तिन्ही नद्या आतापासूनच ठिकठिकाणी कोरडय़ा पडत आहेत. त्यामुळे नदी काठावरील बहुतांश गावांना पाणीटंचाईची तीव्र झळ सोसावी लागणार आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागू नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने टँकर व अन्य व्यवस्था केली जाते. मात्र, ज्या गावातून नदी वाहते त्या गावात अशी कुठलीही व्यवस्था नसते. नदीचे पात्रच जेथे कोरडे पडले आहे त्या गावातही टँकरची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी समोर आली आहे. नदीचे पात्र नष्ट करणाऱ्या वेकोलि व्यवस्थापनावर कारवाईसाठी म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करण्यात आली होती. मात्र, या समितीने केवळ कागदोपत्री काम केले. ही कथा मागे पडत नाही तोच आता वेकोलिच्या या ढिगाऱ्यांमुळे नदीचे पात्र आटले असून जलप्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. वेकोलिच्या या ढिगाऱ्यांची माती अतिशय वेगाने दुर्गापूरच्या नाल्यात उतरली आहे. हाच नाला पुढे दुर्गापूर, नेरी या मार्गाने इरई नदीला मिळतो. ही संपूर्ण पिवळी माती इरई नदीच्या पात्रात उतरत आहे. त्यामुळे नदीचे संपूर्ण पाणी दूषित झाले आहे. केवळ इरई नदीच  नाही तर वर्धा व झरपट नदी, तसेच गावातील नाल्यातही मातीच्या ढिगाऱ्यांचे पाणी उतरत आहे. या ढिगाऱ्यांनी नदीचे पात्र बहुतांश ठिकाणी गिळंकृत केले आहे. अशा गावातील गावकऱ्यांना यावर्षीच्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागणार असल्याचे चित्र आतापासून दिसत आहे. दाताळा मार्गावर तर इरई नदीचे पात्र ठिकठिकाणी कोरडे पडले आहे. पठाणपुरा गेट, विठ्ठल मंदिर परिसरातही नदीचे पात्र आटलेले आहे. अशा स्थितीत जिल्हा प्रशासनाने उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच नदी सफाई अभियान हाती घ्यायला हवे होते. मात्र, जिल्हा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले. त्याचाच परिणाम इरई, झरपट व वर्धा या तीन प्रमुख नद्यांच्या काठावरील गावांना यंदा पाणीटंचाईची झळ सोसावी लागणार आहे.