कामोठे येथील रहिवाशांना गेल्या काही महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे रहिवाशांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत आहेत. अनेक वेळा सिडको प्रशासनाचे याकडे लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे कामोठे रहिवाशांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज बेलापूर येथील रायगड भवनात शिरून सिडको अधिकाऱ्यांना घेराव घातला.
कामोठे वसाहत ही सिडकोने वसविली आहे. त्यामुळे अनेक मुंबईकरांनी येथे घरे खरेदी केली आहेत. वसाहत वाढत असताना येथील पाण्याच्या समस्येनेही गंभीर रूप धारण केले आहे. आज कामोठेला ४५ दशलक्ष घनमीटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता आहे. परंतु सिडको प्रशासनाकडून ३० ते ३२ एमएलडीच पाणीपुरवठा केला जातो. येथील पाणीटंचाईमुळे मुंबईकरांना नवी मुंबई नकोशी वाटू लागली आहे. चार महिन्यांपूर्वी कामोठे वसाहतीमध्ये होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठय़ावर मार्ग काढण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विविध सोसायटय़ांची बैठक घेतली होती. यावेळी पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी सिडको प्रशासनाला निवेदने देण्याचे ठरविण्यात आले. त्याप्रमाणे वेळोवेळी ही निवेदने देण्यात आली. निवेदने दिल्यानंतर येत्या १५ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन सिडकोच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी नेहमी देत असत, परंतु पाणीपुरवठा काही सुरळीत होत नसे.
या आश्वासनाला कंटाळून आज शेकडो संतप्त रहिवाशांनी आमदारांच्या नेतृत्वाखाली अखेर सिडकोचे रायगड भवन गाठले. आणि सिडकोचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एन. पाटील यांच्या कार्यालयात धडक दिली. नागरिकांचा संताप पाहून पुन्हा एकदा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्याचा प्रयत्न पाटील यांनी केला. त्यावेळी संतप्त रहिवाशांनी प्रश्नांची सरबत्ती करून अधिकाऱ्यांना हैराण केले. अखेर पाटील यांनी नमते घेऊन पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत सोसायटय़ांना टॅंकरने पाणीपुरवठा करू असे आश्वासन दिले. या टॅंकरच्या वाहतुकीचा खर्च सिडकोने करावा अशी मागणी यावेळी रहिवाशांनी केली. ती मागणी मान्य करून पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.