विदर्भात उशिराने का होईना पावसाचे दमदार पुनरागमन झाले असून गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. असे असले तरी विदर्भात पिण्याच्या पाण्याची अद्यापही टंचाईच असून गेल्या आठवडय़ात ६४ टँकर्सने पाणी पुरवठा करावा लागल्याची माहिती शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. संपूर्ण राज्यात १ हजार ४८० गावांमधील ३ हजार ७१२ वाडय़ांमध्ये एकूण १ हजार ७२६ टँकर्सने पिण्याचे पाणी पुरवावे लागले.
विदर्भावर पावसाची कधी कृपा होते तर कधी अवकृपा. गेल्या वर्षी तीन-चार महिने विदर्भाला अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले. यावर्षी केवळ फेब्रुवारी व मार्चमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. नागपूर विभागातल्या सहा जिल्ह्य़ांतील २ लाख, २० हजार, ४६६ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यातही अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीने तुडुंब भरलेले जलाशय यंदाचा उन्हाळाही विदर्भाला तापदायक ठरल्याने आटले. त्यातच पाऊस वेळेवर न आल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. जून महिनाही अपवाद वगळता बहुतांशी कोरडा गेला. जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली तरी मौसमी पाऊस चांगलाच लांबला. विदर्भातील ६७ गावांमध्ये ७ ते १४ जुलै या कालावधीत ६२ टँकर्सने पिण्याचे पाणी पुरवावे लागले.
दडी मारलेल्या मौसमी पावसाने गेल्या आठवडय़ात पुनरागमन केले. हळूहळू साऱ्या विदर्भावर त्याने लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. कृषी खात्याकडून उपलब्ध माहितीनुसार १५ ते २१ जुलै दरम्यान बुलडाणा जिल्ह्य़ात ५१.५ मिमी, अकोला जिल्ह्य़ात ५७.२, वाशीम ६२.६, अमरावती १२७.०, यवतमाळ ६०.३, वर्धा १७२.७, नागपूर २०१.१, भंडारा १६३.८, गोंदिया १९९.१, चंद्रपूर १५६.८, गडचिरोली जिल्ह्य़ात २७०.७ मिमी पाऊस पडला. विदर्भातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. गडचिरोली जिल्ह्य़ाचा राज्याशी संपर्क तुटला. असे असले तरी या काळात विदर्भातील ७१ गावांमध्ये ६४ टँकर्सने पिण्याचे पाणी पुरवावे लागले. त्यात अमरावती जिल्ह्य़ामधील १४ गावांत ८ टँकर्सने, वाशीम जिल्ह्य़ामधील १५ गावात १४ टँकर्सने, बुलडाणा जिल्ह्य़ामधील ६ गावात १४ टँकर्सने, यवतमाळ जिल्ह्य़ामधील १६ गावात १४ टँकर्सने, नागपूर जिल्ह्य़ामधील २० गावात १४ टँकर्सचा समावेश आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत विदर्भात केवळ बुलडाणा जिल्ह्य़ातील १९ गावात ५५ टँकर्सने व यवतमाळ जिल्ह्य़ातील १९ गावात ५५ टँकर्सने पिण्याचे पाणी पुरवावे लागले होते, अशी माहिती शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
यंदा पाऊस जुलै महिन्यात उशिरा सुरू झाला. गेल्या आठवडय़ात पाऊस तेवढा दमदार नव्हता. कुठे जास्त, कुठे कमी, तर कुठे पाऊस पडलाच नाही. या परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता हवी तेवढी नव्हती. त्यामुळे एवढे टँकर्स लागले. आता सर्वत्र पाऊस चांगला पडू लागला आहे. त्यामुळे टँकर्सची गरज कमी होईल, असे यासंदर्भात बोलताना एका शासकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.