जर्जर झालेली पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना अजनी वसाहतीत शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
नीलय शामराव रंगारी (१८), रा. सावित्रीबाई फुलेनगर, मानेवाडा रोड, असे मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. कौस्तुभ अशोक डांगरे (१९), रा. अजनी, असे जखमीचे नाव आहे. अजनी वसाहतीतील एका कोपऱ्यात ही पाण्याची टाकी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या पाण्याच्या टाकीचा वापर केला जात नाही. आजुबाजूला मोकळा परिसर असून तेथे झाडे-झुडपी वाढली आहे. दुर्लक्षित असल्याने या पाण्याच्या टाकीखाली परिसरातील तरुण येतात. येथे येऊन ते गप्पा मारतात. आज दुपारी नीलयच्या घरी त्याचे चार मित्र आले. त्यांनी त्याला चालण्याचा आग्रह केला. हे पाच जण या पाण्याच्या टाकीखाली आले. तेथे बसले असतानाच पाण्याची टाकी कोसळली. कड्कड् असा आवाज येताच तिघे पळून गेले. तर दोघे मात्र त्याखाली दबले. मलबा डोक्यावरच पडल्याने नीलय जागीच ठार झाला. तर कौस्तुभ गंभीर जखमी झाला. तो पाण्याच्या टाकीच्या मबल्याखाली दबला होता. जीव वाचवण्यासाठी तो आवाज देत होता. या घटनेत त्याचा उजवा हात फॅक्चर झाला.
दरम्यान, पाण्याची टाकी कोसळल्याची व त्याखाली दोघे दबले असल्याची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ही माहिती कळताच बसपचे नगरसेवक अजय डांगे, त्यांचे सहकारी गौतम कांबळे, गुड्डू निखारे व अन्य कार्यकर्त्यांनी यांनी तेथे धाव घेतली. त्यांनी ही माहिती अग्निशमन दल, रेल्वे पोलीस व अजनी पोलिसांना दिली. पोलीस येईपर्यंत त्यांनी टाकीच्या मलब्यात फसलेल्या दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी झाला. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी टाकीच्या मलब्यातील लोखंडी सळ्या कापून जखमी असलेल्या कौस्तुभला बाहेर काढले व उपचारासाठी मेडिकलला पाठवले. तसेच घटनास्थळीच मृत्युमुखी पडलेल्या नीलयचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी  मेडिकलला पाठवला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदवला.
नीलयला प्रणय नावाचा मोठा भाऊ असून तो बीई द्वितीय वर्षांला आहे. तर तो स्वत: मोहता सायन्स कॉलेजमध्ये अकरावीत शिकत होता. त्याचे वडील हातमजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आई सुनीता रंगारी या होमगार्डमध्ये नोकरीला लागली. आज त्यांचा पहिलाच दिवस होता, अशी माहिती घटनास्थळाहून प्राप्त झाली. पंचवीस वर्षे जुनी असलेली ही पाण्याची टाकी अत्यंत जर्जर झाली होती. ती पाडून टाकावी अथवा तेथे कुणी जाऊ नये असा बंदोबस्त करावा, अशी मागणी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या मागणीची दखल वेळीच घेतली असती तर आजची दुर्घटना घडली नसती, असे मत व्यक्त करून या प्रकरणाला रेल्वे प्रशासन दोषी असल्याचा आरोप नगरसेवक अजय डांगे यांनी केला.