मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी विदर्भवादी व महिलेचा गोंधळ
विदर्भ आणि मराठवाडय़ातील अनुशेष दूर करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नात असून आर्थिक आणि भौतिक अनुशेष तपासण्यासाठी नेमण्यात आलेल्या डॉ. विजय केळकर यांच्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या कामाला अधिक गती येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी येथे केले. दिवंगत वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षांनिमित्त येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात आयोजित विभागीय सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते.
दरम्यान, या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या प्रारंभी ‘जय विदर्भ’ची टोपी घातलेल्या मावळा संघटनेच्या अध्यक्षांनी वेगळ्या विदर्भाची अचानक नारेबाजी केल्याने, तर आभारप्रदर्शनाच्या वेळी पोलिसांनी केलेल्या अन्यायाबाबत एका महिलेने आरडाओरड केल्याने या कार्यक्रमात आज काही वेळ गोंधळ निर्माण झाला.
आजच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अन्न व औषध प्रशासनमंत्री मनोहर नाईक, खासदार आनंदराव अडसूळ आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, अनुशेषाचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. केळकर समितीचा अहवाल येत्या एका महिन्यात अपेक्षित आहे. या अहवालावर चर्चा केली जाणार असून विदर्भ आणि मराठवाडय़ाचा अनुशेष दूर करण्यासाठी अहवालातील शिफारशींची निश्चितपणे अंमलबजावणी केली जाईल. राज्यासमोर कोरडवाहू शेतीचा शाश्वत विकास आणि सहकार चळवळीच्या बळकटीकरणाचे आव्हान असून सिंचनाच्या सुविधा वाढवण्यासाठी विकेंद्रित जलसाठे निर्माण करण्याची आवश्यकता आहे. १९७२ मध्ये राज्यात भीषण दुष्काळ पडलेला असताना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी त्यावर मात करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे, यासाठी रोजगार हमी योजना सुरू केली.
पाणी साठवण्यासाठी जलसंधारणाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला. दुष्काळी परिस्थितीतून राज्याला बाहेर काढून अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले. त्यांच्या निर्णयांमुळेच राज्याला विकासाची दिशा गवसली. विदर्भात मोठय़ा प्रमाणावर कापसाचे उत्पादन होत असल्याने येथेच प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी सहकार कायद्यात दुरुस्त्या सुचवण्यात आल्या आहेत. विदर्भ औद्योगिकदृष्टय़ा मागासलेला आहे. नागपुरात ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ या उपक्रमांच्या माध्यमातून औद्योगिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण आता मंदीचे सावट आहे. काही काळ वाट पाहावी लागणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यात शेतकरी आणि शेती दोन्ही जगले पाहिजे. त्यासोबतच औद्योगिक विकासही आवश्यक आहे. वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांसाठी आणि शेतीविकासासाठी जे कार्य केले ते अत्यंत मोलाचे आहे. शेतकरी हा त्यांचा श्वास होता, तर शेती हा त्यांचा प्राण होता. नव्या पिढीने वसंतराव नाईक यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करायला हवी.
वसंतराव नाईक यांनी दुष्काळाचा सामना कसा करावा, याचे उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे. अन्नधान्यामध्ये राज्य स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी हायब्रीड ज्वारीचे संशोधन आणि उत्पादन घेऊन त्यांनी देशासमोर आदर्श निर्माण केला. विदर्भाच्या विकासाला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले, असे या वेळी शिवाजीराव देशमुख म्हणाले. प्रा. वसंत पुरके यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन आमदार यशोमती ठाकूर यांनी, तर आमदार वीरेंद्र जगताप यांनी आभार मानले.
कार्यक्रमात दोनदा गोंधळ
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर ‘जय विदर्भ’ची टोपी घालून मावळा संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कोराटे यांनी वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ अचानक नारेबाजी सुरू केल्याने गोंधळ उडाला. विदर्भात ३५ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यासाठी ‘चोर’ नेते जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला. लगेच काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्या दिशेने धावले. त्यांच्यात बाचाबाची झाली. नंतर मुख्यमंत्र्यांनीच हस्तक्षेप करून ‘त्यांनी आपले विचार मांडले आहेत. आता आम्हाला आमचे विचार मांडू द्या,’ असे सांगून भाषणाला सुरुवात केली. आभाराच्या वेळी सुनीता चव्हाण नावाच्या महिलेने पोलिसांनी आपल्यावर अन्याय केल्याचे सांगून आरडाओरड सुरू केली. तिने हाती चप्पल घेतल्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी या महिलेला सभागृहाबाहेर काढले.