मालाडमधील अथर्व अभियांत्रिकी महाविद्यायात नुकत्यात पार पडलेल्या ‘आयईईई ओमेगा’ तंत्र महोत्सवात नौसेना, वायुसेना, लष्करासाठी लागणाऱ्या तंत्रावर आधारित मिसाइल, रोबोचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. ‘शस्त्र’ हा या महोत्सवाचा विषय होता.
या वेळी विविध खेळ आणि स्पर्धा रंगल्या. यात इतर ३१ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही भाग घेतला होता. लष्करी अधिकाऱ्यांनीही या महोत्सवाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तंत्रकृतींची पाहणी केली. त्यात प्रामुख्याने मॅग्नेटिक लेव्हिटेशन, मिसाइल लॉन्चर, वॉर हेड, अल्ट्रासॉनिक वापरून रडार, हावरक्राफ्ट, जीपीएस यंत्रणा, ३जी बोट, बॉम्ब निष्क्रियीकरण किट आदींचा समावेश होता.
रोबो वॉर या महोत्सवाचे आकर्षण ठरले. तसेच लघुसंशोधन कामाचे सादरीकरण, चर्चा, कार्यशाळा, एथिकल हॅकिंग कार्यशाळा; याशिवाय लेझर टॅग, एरिया ५१, डिप ब्ल्यू सी, डार्क वोयागर, फिफा, डोटा २ आदी विविध मनोरंजन खेळांचे आयोजनही करण्यात आले होते. या महोत्सवाला डिफेन्स रिसर्च व डेव्हलपमेंट संस्था, इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलाजी व बीएआरसी यांचे सहकार्य लाभले.