दागिने हे स्त्रियांचे पारंपारिक आभूषण असलं तरी सध्याच्या काळात ते घालणं धोकादायक बनत चाललं आहे. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे चोरांनी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईत सोनसाखळी चोरीच्या घटना कमी घडत असल्या तरी आजही मुंबईत दररोज ४ सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महिलांनी काही बाबतीत खबरदारी घेतली तर त्या या चोरीच्या घटनांपासून स्वत:चा बचाव करू शकतात, असे पोलिसांनी सांगितले.
 मुंबई पोलिसांच्या आकेडवारीनुसार गेल्या वर्षी १ जाने ते ३० सप्टेंबर २०१३ या ९ महिन्यांच्या कालावधीत मुंबईत १५१७ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. म्हणजेच दिवसाला सरासरी ६ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम राबवून अशा घटनांना प्रतिबंध आणण्यात यश मिळवले आहे.
 त्यामुळे चालू वर्षांत याच नऊ महिन्यात १०३९ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. म्हणजेच आजही मुंबईत दिवसाला सरासरी ४ सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत. यापैकी पोलिसांनी ४३६ प्रकरणातील सोनसाखळी चोरांना अटक केली आहे. सर्वाधिक सोनसाखळी चोरीच्या घटना उत्तर परिमंडळात म्हणजे जोगेश्वरी ते दहिसर या भागात घडल्या आहेत. तेथे ३२० घटनांची नोंद आहे. त्यापाठोपाठ २८५ घटना पश्चिम परिमंडळात म्हणजे वांद्रे ते अंधेरी या भागात घडल्या आहेत.  

..का होते सोनसाखळी चोरी
सोन्याच्या वाढत्या किंमती हे सर्वसाधारण आणि प्राथमिक कारण आहेच. परंतु गळ्यातून सोनसाखळी चोरणं अत्यंत सोपं असल्याने चोरांनी याकडे आपला मोर्चा वळवला आहे. पुर्वी पाकिटमारी केली जायची. पण डेबीट कार्डचा वापर वाढल्याने पाकिटात फार पैसे नसल्याने चोरांनी मोबाईल आणि सोनसाखळी चोरण्याच्या कामात प्राविण्य मिळवले आहे. रस्त्याने चालणाऱ्या महिलांच्या मागून मोटारसायकलीने यायचं आणि अचानक गळ्यातील सोनसाखळी खेचून पसार व्हायचं ही त्यांची चोरांची पद्धत आहे. संस्कृती आणि परंपरेप्रमाणे प्रत्येक महिला गळ्यात सोनसाखळी घालत असते. त्यामुळे अशा महिला चोरांचे लक्ष्य ठरतात. अगदी कुठेही सहज सोनसाखळी चोरी होते. एक पोलीस निरीक्षक आपल्या पत्नीसह मोटारसायकलीने जात होते. त्यावेळी मोटारसायकलीवरू आलेल्या दोन सोनसाखळी चोरांनी त्या पोलिसाच्या पत्नीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून धूम ठोकली.  एक महिला बस मधून प्रवास करत होती. गर्दीत चोरांनी खिडकीतून हात टाकून त्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केली होती.

..तर सोनसाखळी चोरीच्या घटना रोखता येतील
सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. पण महिलांनी काही छोटया छोट्या गोष्टींची खबरदारी घेतली तर या घटना टळू शकतील. याबाबत बोलताना मुंबई पोलिसांचे प्रवक्ते पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, साधारणत सोनसाखळी चोर हे मोटारसायकलीने येत असतात. त्यामुळे महिलांनी चालतांना रस्त्याच्या कडेवरून न चालता फुटपाथचा वापर करावा. जेणे करून मोटारसायकल तेथे पोहचू शकणार नाही. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने (पण आवश्यक ती काळजी घेऊन) चालावे. म्हणजे डाव्या बाजूने वाहने जात असतील तर उजव्या बाजून वाहने समोरून येणाऱ्या दिशेने चालावे. त्यामुळे तुमच्या मागून मोटारसायकस्वार येऊ शकणार नाही. प्रभात फेरी (मॉर्निक वॉक) आणि देवळात जायच्या वेळी म्हणजे सकाळी तुरळक गर्दी असते. त्यावेळी जास्त सोनसाखळी चोरीच्या घटना घडतात. अशा वेळी सोनसाखळी घालण्याचा मोह आवरावा. रस्त्यावरून जाताना दागिन्यांचे अजिबात प्रदर्शन करू नये, असे कुलकर्णी यांनी सांगितले. सोनसाखळी घातल्यावर ओढणीने किंवा पदराने ते झाकून घ्यावे. जेणेकरून चोरांना ते दिसणार नाही आणि खेचूनही घेता येणार नाही. उघड्या गळ्यातील सोनसाखळी चोरणे हे खूप सोपे काम असते. लग्न समारंभात जाताना सोनसाखळी आणि अन्य गळ्यातील दागिने आपल्या पर्स मध्ये ठेवावे आणि त्या समारंभाच्या ठिकाणी पोहोचल्यावरच घालावे. बसस्थानकात बसची वाट बघत असताना एकदम बाहेर रस्त्यात उभे राहू नये, तर बस थांब्याच्या आत उभे रहावे. आपला गळ्यातील आभूषण पदराने, ओढणीने झाकून घ्यावे किंवा तो दिसणार नाही, याची खबरदारी घेणे हा उत्तम उपाय असल्याचे पोलीस सांगतात.

..सोनसाखळी चोरांवर कडक कारवाई
सोनसाखळी हा गुन्हा जबरी चोरी मध्ये गृहीत धरला जातो. शिवाय आता सोनसाखळी चोरांना पकडल्यावर संघटीत गुन्हेगारी कायद्या अंर्तगत (मोक्का) अटक केली जाते. सोनसाखळी चोरणारे अमली पदार्थाचे सेवन करून अशा चोरी करतात. त्यासाठी पोलिसांनी यापूर्वीच अमली पदार्थाचे सेवन आणि विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केलेली आहे. सोनसाखळी चोरी केल्यावर कमी किमतीत सराफांना विकले जाते. त्यामुळे चोरीच्या सोनसाखळी विकत घेणाऱ्या सराफांनाही पोलिसांनी आरोपी बनविण्यास सुरवात केली आहे. जागोजागी पोलिसांनी बंदोबस्त आणि गस्ती वाढविल्या आहेत. त्यामुळे अनेक वेळा सोनसाखळी चोरी रंगेहाथ पाठलाग करून पकडले गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत.