सिंहस्थ पर्वामुळे लग्न मुहूर्त नसल्याने ‘शुभमंगल सावधान’ होऊ शकणार नाही, हा गैरसमज आहे. विवाह मुहूर्तासाठी सिंहस्थातील सिंह नवांश काल घेऊ नये, असे सांगण्यात आले आहे. यंदा हा काळ चातुर्मासात येत असल्याने विवाह मुहूर्तावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
यंदा १७ जून ते १६ जुलै २०१५ असा अधिक आषाढ महिना आला आहे. तसेच १४ जुलै २०१५ ते ११ ऑगस्ट २०१६ या कालावधीत सिंहस्थ कुंभपर्व आहे. त्यामुळे १२ जून २०१५ नंतर विवाह मुहूर्त नाहीत अशी अफवा पसरली आहे.
विवाह मुहूर्तासाठी सिंहस्थातील सिंह नवांश काल घेऊ नये, असे शास्त्र आहे. हा कालावधी यंदा चातुर्मासातच येत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी १२ जूननंतर नोव्हेंबर व डिसेंबर आणि पुढील वर्षी जानेवारी ते मे आणि जुलै २०१६ मध्ये विवाह मुहूर्त आहेत, असेही सोमण यांनी या पत्रकात म्हटले आहे.
उत्तर भारतात काही थोडय़ा भागात संपूर्ण सिंहस्थ काळात विवाह मुहूर्त नसतात. उर्वरित संपूर्ण भारतात फक्त सिंहस्थ नवांश काळ लग्नासाठी टाळला जातो, असेही सोमण यांनी पत्रकात सांगितले आहे.