दिल्लीतील सामूहिक बलात्कारामुळे सर्वत्र महिलांवरील शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराचीच चर्चा सुरू आहे. परंतु अनेक कर्तृत्ववान महिलांना पुरुषप्रधान वातावरणात मानसिकदृष्टय़ा नामोहरम केले जाते आणि जगणेही मुश्किल केले जाते. अशा मानसिक छळाला सामोरे जावे लागलेल्या महिलांचे आयुष्य शारीरिक वा लैंगिक अत्याचार होणाऱ्या महिलांच्या आयुष्याइतकेच दुर्दैवी आणि त्रासदायक असते याची जाणीवही बहुतांश समाजाला असतच नाही. मात्र अशा गुन्ह्यांना प्रसिद्धी मिळत नाही. किंबहुना हा प्रकार म्हणजे ‘गुन्हा’ आहे हेसुद्धा पोलिसांसकट बहुतेकांना माहीत नसते.
व्यवसायाने सल्लागार असलेल्या स्वप्ना चिटणीस या अंधेरी पूर्व येथील ‘अंधेरी मिस्त्री अपार्टमेंट’मध्ये राहतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी सोसायटीची निवडणूक लढविली आणि त्या निवडून आल्या. सोसायटीच्या व्यवस्थापकीय मंडळावर निवडून आलेल्या त्या एकमेव महिला सदस्य होत्या. मात्र पदभार सांभाळल्यानंतर अवघ्या दोन-तीन महिन्यांतच त्यांनी सदस्यत्वपदाचा राजीनामा दिला. व्यवस्थापकीय मंडळातील पुरूष सदस्य आपल्या मताला किंमत देत नाहीत, चर्चेत सहभागी करून घेत नाहीत, केवळ नामधारी म्हणून आपण सदस्य मंडळावर आहोत, असा आरोप करीत चिटणीस यांनी राजीनामा दिला. याशिवाय व्यवस्थापकीय मंडळातील एक सदस्य निवडून आल्यापासून आपला मानसिक छळ करीत असल्याचा आरोपही त्यांनी राजीनामा देताना केला.
या सदस्याने स्वप्ना चिटणीस यांचा भांडत असल्याचा व्हिडिओ ‘यू-टय़ूब’वर अपलोड केला आहे. आपली प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने या सदस्याने आपण भांडत असल्याचे दाखविणारा एकतर्फी व्हिडिओ ‘यू-टय़ूब’वर अपलोड केल्याचा चिटणीस यांचा दावा आहे. हा पुरूष सदस्य विविध प्रकारे आपला मानसिक छळ करीत असल्याचा आरोप करीत चिटणीस यांनी याबाबत पोलीस ठाण्यातही तक्रार केली. परंतु पोलिसांकडूनही त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही, असा त्यांचा दावा आहे. परिणामी या सर्व प्रकारामुळे कमालीच्या मानसिक तणावाखाली येऊन स्वप्ना चिटणीस यांनी केवळ सोसायटीच्या सदस्यपदावरच नाही, तर मोठमोठय़ा सरकारी-खासगी कंपन्यांना सल्ला देण्याचे आपले कामही बंद केले आहे. मुलगा डॉक्टर असल्यामुळे स्वप्ना चिटणीस या अद्याप मनोरुग्ण बनलेल्या नाहीत वा मानसिकदृष्टय़ा होणाऱ्या खच्चीकरणामुळे त्यांनी काही भलते पाऊल उचलेले नाही.
असेच आणखी एक उदाहरण एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरूणीचे आहे. अलीकडेच या तरुणीने नोकरी सोडून घरी बसणे पसंत केले. वरिष्ठांकडून होणाऱ्या सततच्या मानसिक छळवणुकीमुळे तिला हा निर्णय घ्यावा लागला. उगाचच उशिरापर्यंत थांबविणे, जास्त काम देणे, चूक नसतानाही विनाकारण ओरडणे आदी मानसिक छळाला कंटाळून या तरुणीने अखेर नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
क्षमता असून, पात्रता असून केवळ पुरुषी अहंकारामुळे या महिलांना आपापली कामे बंद करावी लागली. काम बंद करावे लागण्यापेक्षा ज्या कारणासाठी ती बंद करावी लागली त्या कारणामुळे या महिला मानसिकदृष्टय़ा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अशी मानसिक छळवणूक अनेक महिलांच्या वाटेला येते. मात्र समाज त्याची यत्किंचितही दखल घेत नाही हे दुर्दैवी असले तरी सत्य आहे.