योग्य तिकीट असल्याशिवाय प्रवास करणे हा गुन्हा आहे, अशा प्रकारच्या उद्घोषणा वारंवार करूनही पश्चिम रेल्वेवर विनातिकीट प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या फुकटय़ा प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल करून घेण्यासाठी खास तिकीट तपासनीसांच्या पथकासह रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनाही नियुक्त करण्यात येत आहे. फुकटय़ा प्रवाशांना चाप लावण्यास रेल्वेचे मनुष्यबळ मोठय़ा प्रमाणात खर्ची होत असल्याने सुरक्षा दलांवरही ताण पडत आहे.
पश्चिम रेल्वेने गेल्या काही महिन्यांपासून विनातिकीट किंवा बेकायदा तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. ऑक्टोबर महिन्यापासून पश्चिम रेल्वेने धडक मोहीम राबवण्यास सुरुवात केली. या महिन्यात दोन दिवसांत केलेल्या धाडसत्रात १० लाखांपेक्षा जास्त रक्कम दंडापोटी वसूल करण्यात आली आणि पाच हजारांपेक्षा जास्त लोकांना पकडण्यात आले.पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत् चंद्रायन यांच्या म्हणण्यानुसार मध्य रेल्वेच्या तुलनेत पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवरील तिकीट खिडक्यांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने पाच किंवा दहा रुपये मूल्याचे तिकीट देणाऱ्या खिडक्याही सुरू केल्या आहेत. त्याचप्रमाणे सीव्हीएम कुपनचा पर्यायही प्रवाशांकडे आहे. पण पश्चिम रेल्वेमार्गावर एटीव्हीएमची कमतरता आहे. तिकीट खरेदी करण्यात प्रवाशांचा कमीत कमी वेळ जावा, यासाठी पश्चिम रेल्वे प्रयत्नशील आहे. मात्र प्रवाशांनीही थोडेसे सहकार्य करायला हवे, असे चंद्रायन यांनी सांगितले.आकडेवारीवर नजर टाकल्यास ऑक्टोबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ या चार महिन्यांत पश्चिम रेल्वेवर मोठय़ा प्रमाणात विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. नोव्हेंबर महिन्यातच दोन लाखांहून अधिक बेकायदेशीर प्रवासी तिकीट तपासनीसांच्या तावडीत सापडले आणि त्यांच्याकडून साडेआठ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर अगदी गेल्याच महिन्यात फेब्रुवारी २०१४मध्ये एक लाख ६० हजार विनातिकीट प्रवाशांकडून सहा कोटी रुपये वसूल केले गेले.