अपूर्ण रुंदीकरणामुळे दुर्घटनांसाठी कारणीभूत?
ओझरजवळ रविवारी झालेल्या चार वाहनांच्या विचित्र अपघातामुळे नाशिक ते चांदवड या दरम्यान महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. महामार्ग रूंदीकरणाचे काम पूर्ण झाल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केला जात असला तरी पिंपळगाव आणि ओझर या ठिकाणी अद्यापही काम बाकी आहे. अपूर्ण असलेले बांधकाम आणि नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या मागण्यांची दखल न घेण्याची बेपर्वा वृत्ती यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. अजून किती बळी गेल्यावर प्राधिकरणाला जाग येईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मागील महिन्यात चांदवडजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीमुळे झालेल्या विचित्र अपघातात खासगी प्रवासी बसमधील चार जणांचे प्राण गेले होते. ओझरजवळ रविवारी झालेल्या अपघातामुळे त्या अपघाताची आठवण सर्वाना झाली. ओझरय्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांना नाहक प्राण गमवावे लागले. महामार्गालगत असलेल्या वसाहतींमधील रहिवाशांना महामार्ग ओलांडण्यासाठी योग्य पर्यायच उपलब्ध नाहीत. त्यामुळे जीव मुठीत घेऊनच त्यांना महामार्ग ओलांडण्याचे साहस करावे लागते. पंचवटी, ओझर, आडगाव येथे अशाप्रकारे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. अफाट वेगाने जाणाऱ्या वाहनांसमोर अचानक महामार्ग ओलांडणारी एखादी व्यक्ती आल्यास त्या व्यक्तीला प्राणास मुकावे लागते. अन्यथा ब्रेक लावल्यास ते वाहन उलटण्याची शक्यता अधिक असते. महामार्गावरील वाहने किमान गावांजवळ मर्यादित वेगाने जावीत यासाठी काही ठिकाणी गतिरोधक करण्यात आले आहेत. परंतु अनेक चालक त्यांना न जुमानता वेगाने वाहन दामटवितात. अशा ठिकाणी वेग कमी न करता पुढे जाणाऱ्या वाहनांना जागीच दंड करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे अशी वाहने टोल नाक्यांवर सहजपणे वाहतूक पोलिसांच्या हाती सापडू शकतात.
ओझर येथे खंडेराव मंदिरासमोरील चौफुली अपघातास आमंत्रण देणारी आहे. महामार्गावर असलेल्या या चौफुलीवरील एक रस्ता सायखेडय़ाकडे तर दुसरा रस्ता नववसाहतींकडे जातो. मोटरसायकलींपासून ट्रॅक्टर, बैलगाडी अशा सर्वच प्रकारची वाहने ही चौफुली ओलांडत असतात. जवळच महामार्गाच्या दुतर्फा प्राथमिक शाळेसह माध्यमिक विद्यालय आहेत. या पाश्र्वभूमीवर या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल होणे अत्यावश्यक असल्याचे ओझरकरांचे मत आहे. आपल्या या मागणीसाठी ओझरचे नागरिक कित्येक दिवसांपासून लढा देत आहेत. परंतु आश्वासनाव्यतिरिक्त त्यांच्या पदरात अजूनतरी काहीही पडलेले नाही. प्राधिकरण ओझरकरांच्या सहनशीलतेची अजून किती परीक्षा पाहणार हे सांगता येणे अवघड झाले आहे. ओझर ते दहावा मैल यादरम्यान महामार्गालगत झालेल्या नववसाहतींमधील रहिवाशांनाही महामार्ग ओलांडणे कठीण झाले आहे. टिळकनगर परिसरात महामार्ग ओलांडताना अपघात होणे हे नित्याचे झाले आहे. अशीच स्थिती आडगाव ते नाशिक यादरम्यान के. के. वाघ महाविद्यालयाजवळ, हॉटेल जत्रा चौफुली, रासबिहारी चौफुली याठिकाणी आहे. सततच्या अपघातांमुळे वेगळी ओळख निर्माण झालेल्या या ठिकाणांवर वाहतूक सुरक्षिततेसाठी परिसरातील नागरिकांकडून अनेक पर्याय सुचविण्यात आले आहेत. परंतु विविध कारणे उपस्थित करून प्राधिकरणाकडून उपाययोजना करण्यात टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. या सर्व ठिकाणांशी संबंधित लोकप्रतिनिधींची भूमिका जनतेला बुचकळ्यात टाकणारी आहे. जनतेच्या जीवाशी संबंधित या विषयावर लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेणे आवश्यक असताना त्यांची सौम्य भूमिका चकित करणारी आहे. महामार्गालगतच्या वसाहतींना सध्या भेडसावणाऱ्या या समस्येवर उपाययोजना न झाल्यास भविष्यात परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे.