चिऊ काऊच्या गोष्टी ऐकत वाढलेल्या मोठय़ांना आपल्या लहानग्यांना दाखवण्यासाठी चिमण्याच सापडत नाहीत. शहरातील चिमण्यांची संख्या किंवा कोणत्याही पक्षाची संख्या आजपर्यंत मोजली गेलेली नाही. मात्र नेहमी पक्ष्यांच्या जगात वावरणाऱ्या पक्षीतज्ज्ञांनीही शहरातील चिमण्यांची संख्या कमी झाली असून कचरा आणि उकिरडा तसेच धान्य खायला घालण्याच्या नागरिकांच्या सवयीमुळे कावळे, कबुतरे यांची संख्या अपरिमित वाढल्याचे मान्य केले आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच कुलाब्याचे नेव्ही नगर, मलबार हिल, पवई परिसर, आरे कॉलनी अशी हिरवाईची बेटे असलेल्या मुंबईत पक्ष्यांमध्ये बहुविविधता आढळते. यावर्षी जानेवारी महिन्यात करण्यात आलेल्या ‘बर्ड रेस’मध्ये मुंबई, ठाणे, अलिबाग, कर्नाळा परिसरात २५० हून अधिक प्रकारचे पक्षी आढळले होते. त्यात काही स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश होता. काही दुर्मिळ पक्षी पाहण्याची संधीही या निमित्ताने मिळाली. मात्र पक्ष्यांचे निरीक्षण करताना मुंबईतील चिमणीसारखे पक्षी दुर्मिळ होत चालल्याचे लक्षात आले.
मुंबईशेजारच्या जंगलात राहणारे पक्षी शहरात दिसत नसल्याचा अनुभव पक्षीतज्ज्ञ सांगतात. गोंगाट, गजबजाट, माणसांची चाहुल यापासून दूर असलेले जंगलातील शांत वातावरण काही पक्ष्यांना मानवते. मात्र शहरातील परिस्थितीचा फायदा उचलत त्यावर पोसले जाणारे पक्षीही आहेत. कावळे, कबुतरे, घारी या पक्ष्यांना शहरी वातावरण चांगलेच मानवते. सेवाभाव म्हणून धान्य दान करण्याच्या सवयीचे पुनर्लोकन करणे गरजेचे आहे, असे पक्षीतज्ज्ञ संजय मोंगा यांचे म्हणणे आहे.
कावळे, कबुतरे तसेच पाणकावळे, करकोचे, घुबड अशा पक्ष्यांची संख्याही वाढली असल्याचे पक्षीनिरीक्षणातून लक्षात आले आहे. कचरा उकीरडा यामुळे कावळे, उंदरांसाठी घारी तर फुकट टाकलेल्या धान्यामुळे कबुतरांची संख्या वाढली आहे. यासाठी कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावणारी व्यवस्था कारणीभूत आहे. काही पक्ष्यांची संख्या बेसुमार वाढल्याने साहजिकचा परीसंस्थेचा समतोल ढळतो.
चिमण्यांना घरटय़ासाठी आवश्यक असलेली छोटी जागा पूर्वी कौलांच्या छताखाली मिळत असे. मात्र आता काँक्रिटच्या इमारतींमध्ये ही जागाच लुप्त झाली आहे. त्याचप्रमाणे कावळ्यांची, घारींची संख्या वाढल्याने त्यापासून स्वत:चा व पिलांचा बचाव करणेही चिमण्यांना कठीण झाल्याने त्यांची संख्या घटली आहे, असे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी अतुल साठय़े म्हणाले.

चिमण्या किंवा कोणत्याही पक्ष्यांची संख्या मोजण्याची पद्धत अजूनही विकसित झालेली नाही. मात्र हे पक्षी किती वेळा दिसतात. पूर्वी एखाद्या परिसरात त्यांची घरटी किंवा पक्षी किती वेळा दिसत यांचा तुलनात्मक अभ्यास केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने एकत्रितरित्या केल्या होता.
 गेल्या वर्षी झालेल्या या अभ्यासात देशभरातून ५६५५ पक्षीप्रेमी सहभागी झाले. त्यात १४.४ टक्के मुंबईकर होते. ८४२५ ठिकाणांवरील चिमणीच्या नोंदी करण्यात आल्या. ग्रामीण भागातील २२५९ नोंदींनुसार ४ टक्के ठिकाणी चिमण्या अजिबात दिसल्या नाहीत. ७२ टक्के ठिकाणी एक ते ३० चिमण्या दिसल्या आणि २४ टक्के ठिकाणी ३० हून अधिक चिमण्या दिसल्या. त्याचवेळी शहरात मात्र ३६४५ नोंदींनुसार सुमारे १२ टक्के ठिकाणी चिमण्या अजिबातच दिसल्या नाहीत. ७० टक्के ठिकाणी एक ते ३० दरम्यान तर १२ टक्के ठिकाणी ३० हून अधिक चिमण्या दिसल्या.
२००५ मध्ये देशभरात घेण्यात आलेल्या नोंदींनुसार अवघ्या २.५ टक्के ठिकाणांवर चिमण्या अजिबात नव्हत्या. ५५ टक्के ठिकाणी एक ते ३० चिमण्या दिसल्या तर ४२.५ टक्के ठिकाणांवर ३० हून अधिक चिमण्या दिसल्या होत्या. २००५ ते २०१२ दरम्यान घेण्यात आलेल्या नोंदींमध्ये एकही चिमणी दिसत नसल्याची ठिकाणे वाढली तर ३० हून अधिक चिमण्या दिसण्याची ठिकाणे पन्नास टक्क्यांनी कमी झाली. चिमणीचे घरटे दिसण्याच्या संख्येतही २००५ आणि २०१२ च्या अहवालातील नोंदीत दुपटीहून अधिक फरक आहे. बिलकुल घरटे नसलेल्या ठिकाणांचे प्रमाण दीडपटीने वाढले आहे तर नेहमी घरटे दिसणाऱ्या ठिकाणांमध्ये निम्म्याने घट झाली आहे.

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
uran marathi news, uran farmers marathi news, mangroves uran marathi news
उरणच्या शेती, मिठागरांत समुद्राचे पाणी; खारफुटीमुळे शेतकऱ्यांवर जमिनींचा मालकी हक्क गमावण्याची वेळ
Cyber Criminal, Small Amount Fraud, target, Cyber Police, Maharashtra, Unwilling to Register, small fraud cases,
सायबर फसवणुकीच्या हजारो तक्रारींची नोंदच नाही; कोट्यवधी रुपये गुन्हेगारांच्या घशात