वाढता कचरा आणि कचराकुंडय़ांची अपुरी संख्या यामुळे रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरणारा कचरा आणि दरुगधी याचा प्रत्यय मुंबईत अनेक ठिकाणी मुंबईकर घेत आहेत. तर मरोळ-मरोशी भागातील पाचपैकी तीन कचराकुंडय़ा काही दिवसांपासून गायब झाल्याने रस्त्यालाच कचराकुंडीचे स्वरूप येऊ लागले आहे. परिणामी आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होऊ लागली आहे.
मरोळ-मरोशी रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाजवळील बस थांब्यानजीक पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने पाच कचराकुंडय़ांची व्यवस्था केली होती. मरोळ-मरोशी रोड, मरोळ व्हिलेज, गावदेवी तलाव आणि आसपासच्या परिसरातील कचरा या कचराकुंडय़ांमध्ये गोळा केला जायचा. तसेच या परिसरातील फेरीवाले रात्रीच्या वेळी याच कचराकुंडय़ांमध्ये कचरा टाकून निघून जायचे. सकाळी कचरा वाहून गाडय़ा कचराकुंडय़ांमधील कचरा भरून डम्पिंग ग्राऊंडवर घेऊन जायच्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाचमधील
तीन कचराकुंडय़ा गायब झाल्या आहेत. उर्वरित दोन कचराकुंडय़ांची दैना उडाली आहे. पूर्वीप्रमाणेच आजही मोठय़ा प्रमाणावर येथे कचरा टाकला जातो. दोन कचराकुंडय़ा ओसंडून वाहत असतात. तर तीन कचराकुंडय़ा नसल्यामुळे कचरा रस्त्यावर फेकण्यात येतो. त्यामुळे सकाळच्या सुमारास या रस्त्याला बकाल स्वरूप येते. कचरावाहू गाडय़ा कचरा उचलून घेऊन गेल्यानंतरही या परिसरात दरुगधीचे साम्राज्य पसरलेले असते.
मरोळ-मरोशी रोडवरील काही परिसरात घराघरातून कचरा गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. घराघरातून गोळा केला जाणारा कचरा थेट कचरागाडय़ांमधून डम्पिंग ग्राऊंडमध्ये पाठविण्यात येतो. परिणामी पूर्वीइतका कचरा येथे जमा होत नाही, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
पालिकेने या विभागासाठी १५ कचराकुंडय़ा खरेदी केल्या आहेत. मात्र त्या विमानतळ परिसरात ठेवण्यात येणार आहेत. मरोळ-मरोशी रोडवर आणखी तीन कचराकुंडय़ांसाठी लवकरच निविदा मागविण्यात येतील, असे या अधिकाऱ्याने सांगितले. येथील काही विभागांमध्ये घराघरातून कचरा गोळा करण्याची योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कचराकुंडय़ा कमी करण्यात आल्याचे पालिका अधिकारी सांगत आहेत. परंतु आजही मोठय़ा प्रमाणावर येथे कचरा टाकण्यात येत असून उरलेल्या दोन कचराकुंडय़ा कचऱ्याने ओसंडून वाहत आहेत. त्यांच्या बाजूला कचऱ्याचे ढीग साचत आहेत. कचरा उचलून नेल्यानंतरही येथून जाताना नाकाला रुमाल लावून जावे लागते. रस्त्यावर साचणाऱ्या कचऱ्याच्या ढिगामुळे भटकी कुत्री आणि घुशींचाही वावर वाढू लागला आहे. तसेच या परिसरात आरोग्याचे प्रश्नही निर्माण होण्याची भीती आहे. विमानतळ परिसर स्वच्छ राहावा म्हणून १५ नव्या कोऱ्या कचराकुंडय़ा खरेदी केल्या आहेत. पण मरोळ-मरोशी रोडवर साचणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाकडे पालिकेचे लक्ष नाही. पालिकेने पूर्वीप्रमाणेच पाच कचराकुंडय़ा येथे ठेवाव्यात आणि वेळच्या वेळी कचरा उचलून न्यावा, अशी मागणी समाजसेवक अजिज अमरेलीवाला यांनी केली आहे.