मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या ‘अधिसभे’वरील (सिनेट) पदवीधर सभासदांसाठीच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे.
मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, रायगड, कोकण असा विस्तृत परीघ असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील १० पदवीधर सभासदांची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपुष्टात येते आहे. मतदारांच्या पसंतीक्रमानुसार (प्रेफरेन्शिअल व्होटिंग) होणारी ही निवडणूक काहीशी किचकट समजली जाते. परंतु महानगरपालिका निवडणुकीआधी आपली ताकद आजमावण्याची संधी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष या मुंबईतील प्रमुख राजकीय पक्षांना अधिसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिळणार आहे. त्यामुळे, या तिन्ही पक्षांकरिता ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. परिणामी तिन्ही पक्षांनी या निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी उतरण्याकरिता कंबर कसली आहे.
महानगरपालिकेत सातत्याने अडवणुकीचे धोरण अवलंबणाऱ्या आपल्या तोंडदेखल्या भावाला म्हणजे ‘भाजप’ला या निवडणुकीच्या निमित्ताने धोबीपछाड करण्याचा ‘शिवसेना’प्रणीत ‘युवा सेने’चा प्रयत्न असेल. सध्या अधिसभेवर पदवीधरांच्या १० पैकी ८ जागा बाळगणाऱ्या युवा सेनेचाच वरचष्मा आहे. या निवडणुकीच्या खाचाखोचा माहिती असलेल्या व त्यात मुरलेल्या दिलीप करंडे यांच्यासारख्या ज्येष्ठ व अनुभवी राजकारण्याच्या नेतृत्वाखाली पाच वर्षांपूर्वी युवा सेनेने ही निवडणूक लढविली होती. परंतु करंडे यांच्या निधनानंतर या निवडणुकीची जबाबदारी युवा सेनेचे सर्वेसर्वा आदित्य ठाकरे यांच्यावर असणार आहे. त्यामुळे शिवसेनेकरिता ही निवडणूक वेगळ्या अर्थानेही प्रतिष्ठेची असेल.
उरलेल्या दोन जागांवर मनसेप्रणीत ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’चे दोन सदस्य आहेत. मात्र, अंतर्गत कुरबुरींची बाधा झाल्याने मनविसे यंदा या निवडणुकीत विरोधकांशी यंदा कितपत दोन हात करू शकेल असा प्रश्न आहे. या शिवाय भारतीय जनता पक्षप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने देखील या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. निवडणूक लढविण्यासाठी आमच्याकडे काहींनी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र परिषदेच्या पातळीवर अद्याप काही निर्णय झाला नसल्याचे अभाविपतील सूत्रांनी सांगितले. या शिवाय काँग्रेसप्रणीत एनएसयूआय, राष्ट्रवादी काँग्रेसची विद्यार्थी संघटना, प्रहार विद्यार्थी संघटना आदी अन्य संघटनाही या निवडणुकीत आपली ताकद आजमावणार आहेत.
दरम्यान अधिसभेवरील दहा सदस्यांच्या निवडणुकीकरिता पदवीधर मतदारांची नोंदणी व पुनर्नोदणी सुरू झाली आहे. अधिकाधिक पदवीधरांची नोंदणी करून घेऊन आपल्या मतांची बेगमी करणे यावर पहिल्या टप्प्यात सर्वाचा भर असेल. एक महिन्यात नोंदणीचे काम पूर्ण झाल्यानंतर मग निवडणुकीचे डावपेच आखण्यास सुरुवात होईल. त्यामुळे पुढचे दोन महिने तरी विद्यापीठातील वातावरण निवडणूकमय असणार आहे.