‘२६/११’ च्या मुंबई हल्ल्यातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का केली गेली नाही, त्या वेळी  साळस्करांना वेळीच मदत का मिळाली नाही, असा खळबळजनक सवाल शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे आणि शहीद विजय साळस्कर यांची मुलगी दिव्या हिने उपस्थित केला आहे.
‘२६/११’ च्या मुंबई हल्ल्याला सोमवारी ४ वर्ष पूर्ण झाली.  त्या निमित्ताने राज्य शासनाच्या वतीने पोलीस जिमखाना येथे आयोजिलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमानंतर त्यांनी आपल्या मनातले हे सवाल उघडपणे व्यक्त केले.
या वेळी बोलताना कविता करकरे म्हणाल्या की, कसाबला फाशी दिल्याचा आनंद सर्वत्र साजरा होत आहे. आम्हाला तेवढा आनंद झालेला नाही. कारण, त्याच्या फाशीने आम्ही गमावलेली माणसे काही परत येणार नाहीत. हल्ल्यानंतर मुंबई अजूनही सुरक्षित नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
 विजय साळस्कर यांना हल्ल्यामध्ये गोळी लागली. मग त्यांना वेळीच मदत का नाही मिळाली. याबाबत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. या संबंधातच शहीद  विजय साळस्कर यांची मुलगी दिव्या हिने सुद्धा आपली नाराजी व्यक्त केली. माझ्या वडिलांना मदत मिळण्यात उशीर का झाला, याचे उत्तर मला अद्याप मिळालेले नाही. कुणाला याबाबत काहीच सोयरसुतक राहिले नसल्याची खंतही तिने व्यक्त केली.
श्रद्धांजली कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील, पोलीस महासंचालक संजीव दयाल, मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी मंत्री आणि अधिकाऱ्यांची आपल्या पायातले बूटं आणि चपला न काढल्याने शहिदांच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली.