सिंहस्थ, कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर विविध कामांसाठी सुरू असलेल्या टेकेदारी पध्दतीविरोधात मेघवाळ समाजातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे.
महाराष्ट्र मेघवाळ समाजातर्फे मुंबई येथे अलीकडेच सामुहिक विवाह सोहळा तसेच दलित सामाजिक समरसता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मेघवाळ समाजाचे धर्मगुरू खा. शंभुनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाशिकमधील ठेकेदारीविषयी मुख्यंत्र्यांना अवगत करण्यात आले. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी राज्यात मेघवळ समाज मोठय़ा प्रमाणावर असून समाजाचे प्रश्न त्वरित सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही दिली. दलितांना जात प्रमाणपत्र मिळविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासंदर्भातील नियमांमध्ये सुधारणा करून ही प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
विवाहाला ५०वर्षे पूर्ण केलेल्या समाजातील जोडप्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. दलित सामाजिक समरसता परिषदेत मेघवाळ, रोहिदास, बाल्मिकी, रुखी, चर्मकार समाजातील मान्यवर सहभागी झाले होते.