ऋतुचक्र भरकटल्याचा सर्वाधिक परिणाम हिवाळ्यावर झाला असून ऐन दिवाळीत पांढऱ्याशुभ्र धुक्यासह हजेरी लावणारी थंडी आता महिनाभर उशिराने म्हणजे नाताळात अवतरू लागली आहे. त्यामुळे उबदार कपडय़ांच्या बाजारपेठेतील उलाढालही कमालीची थंड आहे. चार महिने मुक्कामी असणारी थंडी जागतिक तापमानवाढीमुळे जेमतेम महिना-दोन महिन्यावर येऊन ठेपल्याने ही परिस्थिती उद्भवली असून त्यातून मार्ग काढण्यासाठी आता उबदार कपडय़ांना रुबाबदारपणाची झाक दिली जाऊ लागली आहे. त्यामुळे स्वेटर्स, मफलर्स, शाल या पारंपरिक कपडय़ांबरोबरच चामडी अंगरखे, ‘कोई मिल गया’तील ‘जादू’ने लोकप्रिय केलेले हुडी अथवा कानटोपी असणारा अंगरखा, हातमोजे, हेडबॅन्ड्स (कानझाके) आदी प्रकारचे कपडे बाजारात दिसू लागले आहेत.
थंडीपासून बचाव करण्यासाठी वापरले जाणारे ढगळे अथवा आखूड स्वेटर्स आता कालबाह्य़ झाले आहेत. आता पूर्वीच्या तुलनेत थंडी अवघी चार दिवसांची असली तरी निरनिराळ्या निमित्ताने फॅशन म्हणून या उबदार कपडय़ांना तरुण-तरुणी पसंती देऊ लागले आहेत. मॉर्निग वॉकपासून रात्री उशिराने परतणारे अशा प्रकारचा विशिष्ट पेहराव करू लागले आहेत. दुचाकीवरून भरधाव वेगाने जाताना बोचऱ्या थंडीपासून वाचण्यासाठी उबदार कपडे आणि कानटोप्या उपयोगी ठरतात. तसेच थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनाला जाताना अथवा डोंगर-कपाऱ्यांमध्ये ट्रेकिंगच्या मोहिमेत अशा प्रकारच्या कपडय़ांना पसंती दिली जाते. हल्ली शाळेत जाणाऱ्या लहान मुलांसाठीच्या हिवाळी गणवेशामध्येही कानटोपी असणारा अंगरखा वापरला जाऊ लागला आहे, जेणेकरून या बोचऱ्या थंडीपासून लहान मुलांचे संरक्षण होईल. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांतील व्यक्तींसाठी निरनिराळ्या प्रकारचे व रंगाचे उबदार कपडे बाजारात उपलब्ध आहेत.
तरुणांचा कल चामडय़ाच्या अंगरख्याकडे अधिक आहे. हे अंगरखे वरून जरी चामडय़ाचे असले तरी त्यात लोकरीचे अस्तर वापरले जाते. महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणींमध्ये पेहराव्याप्रमाणे आकर्षक रंगांचे मफलर्स, शाल किंवा कॅज्युअल वेअरवर साजेशा अशा जिपर्सना अधिक पसंती आहे. त्याचप्रमाणे रात्री झोपताना वापरल्या जाणाऱ्या कपडय़ांमध्येही लोकर वापरली जात आहे. या सर्व हिवाळी पेहरावांमध्ये आधुनिक फॅशनचा वापर करून लोकांच्या गरजेला फॅशनची जोड देऊन नाताळ अधिक रुबाबदारपणे साजरा करता येणार आहे.

कृत्रिम वातानुकूलनापासून बचाव
हल्ली अनेक कार्पोरेट कार्यालयांमध्ये मध्यवर्ती वातानुकूलीन यंत्रणा असते. तिथे असणाऱ्या यंत्रणेसाठी वातावरण थंड ठेवणे आवश्यक असते. मात्र बहुतेक कर्मचाऱ्यांना ती थंडी सोसवत नाही. त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी कार्यालयात अशा प्रकारचे उबदार कपडे घातले जातात. अनेकजणांचा तो आता कार्यालयीन गणवेशच झाला आहे.