42का र्तिक महिना येतो, तोच मुळी थंडी घेऊन. आता ही थंडी महाराष्ट्रात निरनिराळ्या भागांत वेगवेगळ्या पद्धतीने जाणवायला लागते. काही भागांत हीच थंडी गुलाबी, तर काही भागांत ही बोचरी वाटते. काही भागांत तर या थंडीत धुक्याची सलगीपण दिसते; पण आमच्यासारख्या ठाणेकरांना पहिली थंडी जाणवते ती नाकाला. म्हणजे असे की, रस्त्यावर पडलेल्या लांब देठाच्या पांढऱ्या ‘बूचा’च्या फुलांचा सडा आणि त्याचा दरवळून राहिलेला मादक सुगंध नाकातून आत शिरतो आणि जाणवते की, कार्तिक महिना थंडी घेऊन आला.
– दुसऱ्यांदा थंडी जाणवते ती डोळ्याला. आकाशातून पसरलेल्या पंखांच्या जोडीच्या मधून लांब मान आणि त्याला पुढे लांब चोच धरून, तर पाठीमागे पाय ताणून उडणाऱ्या पक्ष्यांच्या व्ही आकारातल्या माळा उंचावरून सपासप अंतर कापत जाताना दिसतात तेव्हा समजते की, स्थानांतर सुरू झाले आहे.
– थंड, वादळी हवामानापासून बचाव करण्यासाठी पक्षी स्थलांतर करतातच; पण हे काही मुख्य कारण नाही. गरम रक्ताच्या आणि संपूर्ण शरीरावर असणाऱ्या पिसाचे आच्छादन त्यांचे थंडीपासून सहज संरक्षण करू शकते. थंडीत मुख्य अडचण असते ती अन्न मिळवण्याची. थंडीत भासणारी फळांची आणि त्याचबरोबरीने किडे-अळ्या यांची कमतरता एकीकडे आणि त्याच वेळी या घटत जाणाऱ्या अन्नाचा शोध घेण्यासाठी मिळणाऱ्या वेळेचीसुद्धा कमतरता, कारण सूर्यसुद्धा लवकर मावळायला लागतो.
– म्हणूनच थंडीचे दिवस हे आमच्यासारख्या पक्षी निरीक्षकांना पर्वणीच असते. त्यातले अनेक पक्षी ठाणा खाडीवर, तर डोंबिवलीजवळील ‘निळजे’ गावातील तलावावरही उतरतात. शिवडीला तर फ्लेमिंगो किंवा रोहित हे लाल पंखांचे, उंच पायाचे आणि लांब मानेचे पांढरे पक्षी हजारोंच्या संख्येनी उतरतात आणि अत्यंत दाटीवाटीने उभे राहून पाण्यात माना खुपसून आतल्या बाजूला वळलेल्या चोचीने अन्न शोधायला लागतात. अशा प्रकारे स्थलांतर करून आलेल्या आणि पाणथळ जागी उतरलेल्या पक्ष्यांमध्ये लक्ष वेधून घेणारा एक पक्षी आहे इबिस . कोंबडीपेक्षा थोडा मोठा असणारा हा पक्षी सर्वप्रथम नजरेत भरतो तो त्याच्या वैशिष्टय़पूर्ण चोचीमुळे. याची चोच हुबेहूब ‘कुदळी’सारखी दिसते. म्हणून आपल्या मराठीत याला ‘कुदळ्या’ हेच नाव आहे. मोठे तलाव, नदीचे काठ, खाडी अशा पाणथळ जागी उतरलेला हा पक्षी पाण्याच्या काठालाच अन्न शोधताना दुर्बिणीशिवायसुद्धा दिसतो. याच्या एकूण ३ प्रजाती इथे सहजासहजी दिसतात.
– एक पूर्ण पांढरा, पण काळ्या डोळ्याचा, तर दुसरा पूर्ण काळा, पण लाल टोपीचा, तर तिसरा दिसायला जरी काळा दिसला तरी सूर्यकिरणे पडल्यावर झळाळणारा म्हणून ग्लॉसी इबिस. इंद्रधनुष्य दिसण्यासाठी जसा पाऊस आणि सूर्याचे ऊन यांचा एक विवक्षित अँगल येण्याची आवश्यकता असते, अगदी तसेच या कुदळय़ाचा झळाळता जांभळा, हिरवा, निळा आणि काळा रंग पाहण्यासाठी आवश्यक तो अँगल मिळवायला थोडी वाट पाहावी लागते इतकेच.