गेल्या दोन दिवसांत मुंबईत गारठा वाढला आणि थंडीची चाहुल लागली. पण दिवसा ऊन आणि रात्री गारठा तशात दमट हवा अशा विचित्र हवामानामुळे गुलाबी थंडीचा सुखद अनुभव मिळण्याऐवजी मुंबईतील हवेत विषाणूंची वाढ वेगाने होत असून मुंबईकर ताप, सर्दी, खोकला यासारखे विषाणूजन्य आजारांनी बेजार झाले आहेत. घरटी एक जण तरी  सर्दी-खोकल्याने त्रस्त आहे. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत या आजारांनी बेजार असलेल्या रुग्णांची संख्या सुमारे २० टक्क्यांनी वाढली असून दम्याच्या रुग्णांसाठीही सध्याचे वातावरण त्रासदायक ठरत आहे.
मुंबईतील हवामान गेल्या दोन दिवसांत बदलले. किमान तापमान १९.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. पण थंडी मुंबई मुक्कामी येण्यास अद्याप काही दिवस अवकाश आहे. परिणामी दिवसा उन्हामुळे उष्णता आणि सायंकाळनंतर चांगलाच गारठा असे वातावरण तयार झाले आहे. तशात सागरी किनाऱ्यामुळे हवेत बाष्प असते. अशा वातावरणाात विषाणूंची वाढ लवकर होते आणि संसर्गही वेगाने फैलावतो. त्यामुळे आता मुंबईकरांना सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे असे त्रास सुरू झाले आहेत.
सध्या ना धड थंडी ना धड ऊन असे वातावरण असल्याने संसर्गजन्य रोग वाढले आहेत. मुंबईत गर्दीही जास्त असल्याने सर्दी-ताप, खोकल्यासारखे आजार अधिक वेगाने पसरतात. या आजारांमुळे त्रस्त असलेल्यांचे रुग्णांची संख्या नेहमीपेक्षा सुमारे २० टक्क्यांनी वाढल्याचे दिसत आहे, असे डॉ. सुहास पिंगळे यांनी सांगितले. तसेच या वातावरणाचा दमेकरी रुग्णांनाही खूप त्रास होत आहे. घामाचे प्रमाणही सतत कमी जास्त होऊन शरीरावर ताण येत आहे व लोकांना थकवा जाणवतो, असेही पिंगळे म्हणाले.
अशावेळी या रोगांपासून बचाव होण्यासाठी ऊन्हात फार वेळ राहू नये. भरपूर पाणी प्यावे, सकस आहार घ्यावा म्हणजे प्रतिकार शक्ती वाढून रोग दूर ठेवता येऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे काहीही त्रास झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत, मनाने गोळय़ा घेऊ नयेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
पुण्यातही हिवाळा सुरू झाल्यानंतरही संसर्गजन्य आजारांमध्ये घट झालेली नाही. उलट दिवसा ऊन आणि रात्री बोचरी थंडी अशा विषम तापमानामुळे नेहमीच्या सर्दी-पडसे-ताप या संसर्गजन्य आजारांबरोबरच गोवर-कांजिण्यांचेही रुग्ण आतापासूनच आढळू लागले आहेत. पुण्यात दिवाळीमध्ये थंडीची चाहूल लागली खरी, पण मध्येच ढगाळ वातावरणामुळे तापमानात चढ-उतार सुरूच आहे. या आठवडय़ात पारा १२ अंशांच्या आसपास पोहोचला. मात्र, त्यात पुन्हा काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण कायम आहे.
विषम वातावरणात सर्दी-पडसे, खोकला इन्फ्लुएन्झा (फ्लू) या आजांरांमध्येही वाढ झाली आहे. हे आजारही नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच सर्वाधिक आढळतात. गोवर आणि कांजिण्या हे आजार पूर्वी प्रामुख्याने उन्हाळ्यात दिसत असत. परंतु या आजारांचे रुग्णही आतापासूनच आढळू लागले आहेत.
संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी काय करायचे?
* जिथे खूप माणसे येत असतात तिथे डोळे आलेल्या माणसाने जाऊ नये. डोळे आलेल्या माणसाला दूर ठेवावे. बोरीक पावडर कपभर पाण्यात चिमुटभर टाकून उकळावी व ते पाणी थंड करून थेंब डोळय़ात टाकावेत.
* पुदिना, आले, लसूण, ओळी हळद, तुळशीची पाने व मिरपूड हे पदार्थ जेवणात घेतले तर ताप दूर ठेवता येतो. मीठ व हळद घालून गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
* घशाचा संसर्ग टाळण्यासाठी काळे मनुके स्वच्छ धुवून खावेत.
     वैद्य प. य. वैद्यखडीवाले