* ‘टेकफेस्ट-२०१३’मध्ये अनेक सामाजिक उपक्रमांची नांदी
* ३ जानेवारीपासून ५ जानेवारीपर्यंत आयआयटीमध्ये धम्माल
दरवर्षी वेगवेगळ्या कल्पनांमुळे आणि तंत्रज्ञानातील अनोख्या संशोधनांमुळे देशभरातील सर्वाच्याच उत्सुकतेचा विषय असलेला ‘आयआयटी-मुंबई’चा ‘टेकफेस्ट’ उद्या, गुरुवारपासून सुरू होणार आहे. तंत्रज्ञान, अभियांत्रिकी क्षेत्रातल्या वेगवेगळ्या स्पर्धाबरोबरच मान्यवरांच्या कार्यशाळा, व्याख्याने आणि ‘प्रॉम्प नाईट’सारखे धम्माल मनोरंजनाचे कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘टेकफेस्ट’मध्ये आहेत. मात्र यंदा ‘आयआयटी-मुंबई’ने सामाजिक जाणीवही जपून काही वेगळे उपक्रमही राबवले आहेत. गेल्या वर्षी ‘टेकफेस्ट’मध्ये तब्बल ९२ हजार विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धामध्ये भाग घेतला होता. यात देशविदेशातील २५ हजार विद्यार्थ्यांचा समावेश होता. यंदा हा आकडा सव्वा लाखाच्या आसपास जाईल, असा अंदा वर्तवण्यात येत आहे.
‘टेकफेस्ट-२०१३’ची नांदी गेल्या वर्षीच झाली असून ‘गिव्ह ए कॉइन’ या उपक्रमाद्वारे तरुणाईच्या या महोत्सवाने आगळावेगळा सामाजिक उपक्रमही हाती घेतला आहे. या उपक्रमात पुणे, नाशिक आणि अशा विविध ११ शहरांतील ४० महाविद्यालये सहभागी झाली. यात आयआयटी-मुंबईने या महाविद्यालयातील मुलांना केवळ एक नाणे दान करण्याचे आवाहन केले होते. या उपक्रमाचा उद्देश आहे तो अनाथ किंवा गरीब मुलांना आर्थिकदृष्टय़ा दत्तक घेणे! एका नाण्याने काही फार मोठा निधी गोळा होणार नाही. मात्र यातील काही तरुणांना या प्रश्नाचे गांभीर्य समजेल आणि पुढे जाऊन ती मुले कदाचित मोठय़ा प्रमाणात आर्थिक भार उचलतील, असे आयोजकांनी सांगितले. आतापर्यंत या उपक्रमाद्वारे एक लाख रुपये जमले आहेत.
त्याशिवाय ‘टेकफेस्ट’ने देशातील महाविद्यालयांसमोर एक आगळेवेगळे आव्हान ठेवले आहे. हे आव्हान म्हणजे ‘ग्रीन कॅम्पस’. या स्पर्धेत आतापर्यंत देशभरातील ७५०हून अधिक महाविद्यालयांनी सहभाग घेतला आहे. या उपक्रमात प्रत्येक महाविद्यालयाला ऊर्जा, हवा व वातावरण, जैवविविधता, टाकाऊ वस्तू, अन्न, सोशल मीडिया, पाणी, भूव्यवस्थापन अशा विविध विभागांतील तब्बल ९९ आव्हाने पार करायची आहेत. आतापर्यंत ५०पेक्षा जास्त महाविद्यालयांनी यापैकी ८५ आव्हाने पार केली आहेत. या स्पर्धेतील विजेत्याला अडीच लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
या सामाजिक उपक्रमांबरोबरच ‘टेकफेस्ट’मध्ये यंदा नेहमीप्रमाणे स्पर्धाही खच्चून आहेत. यात रोबोवॉरसारख्या कल्पना व तंत्रज्ञान यांचा कस लावणाऱ्या स्पर्धेचाही समावेश आहे. त्याशिवाय विविध देशांमधील संस्कृतींचे आदानप्रदान व्हावे, या उद्देशाने यंदा पहिल्यांदाच ‘मॉडेल युनायटेड नेशन्स’ ही संकल्पनाही राबवण्यात येणार आहे. यात १० देशांतील विद्यार्थी सहभागी होणार असून त्यासाठी तीन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच ध्वनिप्रदूषणावर मात करणारा ‘सायलेण्ट डिस्को’ हेदेखील यंदाच्या टेकफेस्टचे आकर्षण असेल. रात्री दहानंतर ध्वनिप्रदूषणाचे नियम कडक असल्याने मुंबईत हा ‘सायलेंट डिस्को’ आकर्षण ठरेल, अशी खात्री आयोजकांनी व्यक्त केली आहे.