जयेश जाधव.. एका बहुराष्ट्रीय कंपनीत अभियंता म्हणून काम करणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातला वसईतील तरुण. नुकताच परदेशातून परतलेला. आपलं घर भले आणि आपण.. या मध्यमवर्गी मानसिकतेचा. एक दिवस अचानक त्याच्या घरी दहिसर पोलिसांची नोटीस आली आणि त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. एका प्रकरणात जयेशवर चोरीचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याला पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. ही काय भानगड आहे, कसली चोरी, कसला गुन्हा या विचाराने त्याचे कुटुंबीय पुरते हवालदिल झाले.
दहिसर पोलिसांनी कलम ४१ (१) अ अन्वये जयेश जाधवला ही नोटीस बजावण्यात आली होती. एका प्रकरणात पोलिसांनी जयेशचा ट्रक जप्त केला असून त्याचा ट्रकचालक फरार झाला आहे. त्यामुळे तुमच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस ठाण्यात हजर व्हा असे या नोटिशीत बजावले होते. नोटीस वाचून जयेश आणि त्याचे कुटुंबीय पुरते हादरले. यामुळे पहिला प्रश्न पडला कुठला ट्रक, कसली चोरी, कोण ड्रायव्हर? काहीच कळायला मार्ग नव्हता. कारण काही वर्षे अमेरिकेत वास्तव्य, मग मुंबईत आल्यावर बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करणं. असं असताना ट्रक आणि चोरीचा हा काय प्रकार ही भानगड लक्षात येत नव्हती. नामसाधम्र्याची चूक असेल तर घरचा पत्ता अचूक होता. त्यामुळे सगळे चक्रावले होते. आयुष्यात साधी कुणाला शिवीगाळ केली नाही आणि आता चक्क चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने करियरच अधांतरी दिसू लागलं होतं. अखेर हिंमत करून जयेशने या प्रकरणी दहिसर पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर ज्या गोष्टींचा खुलासा झाला त्या धक्कादायक होत्या. बोरीवली तहसीलदारांनी जून महिन्यात बेकायदेशीर वाळू चोरी करून नेणाऱ्या एका ट्रकवर छापा घातला होता. त्यावेळी ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला होता. दहिसर पोलिसांनी ट्रकच्या क्रमांकावरून परिवहन कार्यालयात माहिती मागवली, तेव्हा हा ट्रक जयेश जाधवच्या मालकीचा असलेला आढळला. त्यामुळे पोलिसांनी जयेशला ही नोटीस पाठवली होती. परंतु तो मी नव्हेच हे सिद्ध करता करता जयेशची पुरती दमछाक झाली. दहिसर विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप रूपवते यांना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले आणि त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. वसई विरार पट्टय़ात अनेक वाळूमाफिया आहेत. ते याच पद्धतीने दुसऱ्याच्या नावावर बोगस नोंदणी करून घेतलेल्या ट्रकद्वारे वाळू चोरी करत असावे असेही या निमित्ताने समोर आले आहे.

बोगस कागदपत्रांच्या
आधारे वाहन खरेदी
या प्रकाराबाबत बोलताना साहाय्यक पोलीस आयुक्त रूपवते यांनी सांगितले की, बनावट कागदपत्रांच्या आधारे परिवहन खात्यातून हे वाहन जयेशच्या नावावर घेतले असावे आणि मग गुन्हेगारी कारवायासाठी वापरले जात असावे. अशा प्रकारची ही नवीन पद्धत समोर आली आहे. सर्वसामान्य लोक आपली कागदपत्रे अनेकांना विविध कामासाठी देत असतात. त्याचा गैरवापर होत असल्याने ही बाब आहे. आम्ही परिवहन खात्याकडून कुठल्या कागदपत्राच्या आधारे या वाहनाची नोंद केली, कोण आलं होतं त्याची चौकशी करून पुढील कारवाई करणार असल्याचे दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी सांगितले. परिवहन खात्यातील भ्रष्टाचारामुळे कसलीही खातरजमा न करता खोटय़ा कागदपत्रांच्या आधारे या वाहनाची नोंद करण्यात आली. हे वाहन वाळू चोरीच्या गुन्ह्य़ासाठी वापरण्यात आले होते. परंतु अशा पद्धतीने अन्य गंभीर गुन्ह्य़ासाठीही अशा पद्धतीने घेतलेल्या वाहनांचा गैरउपयोग होऊ शकतो, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. आपण कुणाला दिलेली कागदपत्रे सुरक्षित नाहीत, हेसुद्धा यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

नोटीस मिळाल्यापासून आम्हाला झोप नव्हती. जोपर्यंत माझे नाव या गुन्ह्य़ातून वगळले जात नाही तोपर्यंत डोक्यावर टांगती तलवार राहणारच आहे, असे जयेशने सांगितले. ज्या अर्थी माझ्या कागदपत्रांच्या आधारे हा ट्रम्क घेतला आहे तसा तो अनेक लोकांच्या बाबतीतही घडू शकलेला असेल. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या टोळीचा पकडणे आवश्यक आहे, असेही तो म्हणाला. दहिसर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.