सीएसटी-पनवेल लोकलमधून पडून एक महिला गंभीर जखमी झाली. खारघर व मानसरोवर स्थानकांच्या दरम्यान दुपारच्या वेळेस ही घटना घडली आहे. जखमी महिलेला महानगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.
पनवेल रेल्वे पोलिसांना एक प्रवासी लोकलमधून कोसळली असल्याची माहिती दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान मिळाली. पोलिसांनी शोध मोहीम राबवली असता खारघर आणि मानसरोवर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान ही महिला जखमी अवस्थेत आढळून आली. तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.  मात्र जखमी महिला अद्याप शुद्धीवर आली नसल्याने तिची ओळख पटू शकली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.