वेस्टर्न इंडिया स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे सात डिसेंबर रोजी सर्वागी सारीज प्रस्तुत यॉर्क वुमन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. खास महिलांसाठी आयोजित ही टीएसडी प्रकारची रॅली आहे. त्यात कमाल वेग मर्यादा ४५ किलोमीटर प्रती तास असणार आहे. या वेगाच्या वर कोणी जाऊ शकत नाही. म्हणजे नेहमीच्या वेगाने गाडी चालविण्यासारखे असून दिलेल्या वेग मर्यादेत गाडी चालवत ठराविक ठिकाणापर्यंत रॅली संपवायची आहे. या रॅलीसाठी प्रवेश संख्या मर्यादित असल्याने इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.टीएसडी रॅलीबाबतची माहिती मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. टीएसडी रॅली ही वेळ, वेग आणि अंतर यांच्याशी संबंधित आहे. या रॅलीत ४५ किलोमीटर प्रती ताशी वेगाच्या वर कोणी जाऊ शकत नाही. म्हणजे, नेहमीच्या गाडी चालविण्यासारखी गाडी चालवावी लागणार आहे. नेहमीच्या शर्यतीसारखी ही शर्यत नसून कोणी स्पर्धक वेळेच्या आधी पोहोचले तर गुण कापले जाण्याची शक्यता असते. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दुचाकीला एक हजार तर चारचाकीला दोन हजार रुपये इतके शुल्क आहे. त्यात रोड बुक, रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठीचा खास परवाना, ओळखपत्र, खाद्यकुपन, पारितोषिक वितरण सोहळ्याचे निमंत्रण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रॅलीत सहभागी होण्यासाठीचा खास परवाना. याबाबतची पूर्तता विसाकडून केली जाईल. प्रवेश घेण्यासाठी ५ डिसेंबर अखेरची तारीख आहे. त्यानंतर ६ डिसेंबर रोजी दुपारी एक ते सायंकाळी पाच या कालावधीत गंगापूर रस्त्यावरील सर्वागी सारीज् येथे कागदपत्रांची तपासणी व पूर्तता करण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी साडे सहा वाजता गाडी चालकांसाठी खास मार्गदर्शन आणि त्यानंतर रात्री प्रवेशिका आणि त्यांची क्रमवारी प्रकाशित करण्यात येईल. ७ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता पहिली दुचाकी रवाना करून रॅलीला सुरूवात होईल. या संदर्भात अधिक माहितीसाठी २३१६०६७, ७७६८०८००४४ या क्रमांकावर संपर्क साधावा.