विविध कारणांमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका होण्यासाठी महिला अंधश्रद्धांना बळी पडतात, असे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या कार्यकर्त्यां मुक्ता दाभोलकर यांनी येथे बोलताना सांगितले.
राज्य साहित्य संस्कृती मंडळ व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित ग्रंथोत्सव कार्यक्रमात ‘अंधश्रद्ध निर्मूलनात महिलांची भूमिका’ या विषयावरील परिसंवादात दाभोलकर बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की समाजात अनेक अनिष्ट प्रथा असून त्यामुळे महिलांच्या जगण्याच्या स्वातंत्र्यावर बंधने आली आहेत. वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा, या भावनेमुळे सासरी सुनेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. मानसिक छळापासून मुक्तता मिळावी म्हणून महिला अंधश्रद्धेच्या मार्गाला लागतात. आपल्या आयुष्याचा निर्णय घेण्याची क्षमता आपल्यातच असल्याची जाणीव मुली आणि महिलांमध्ये निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी मुलींनी अधिक शिक्षण घेतले पाहिजे.
समाजात स्त्रीला दुय्यम वागणूक दिली जाते, असे सांगून त्या म्हणाल्या, की लग्नानंतर मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. समाजाची ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. समाजात महिलांचे शोषण होत असून त्यास पुरुषही जबाबदार आहेत. दुय्यम वागणूक मिळत असल्याने दु:ख प्रकट करण्यास अंगात येण्यासारखे प्रकार घडतात, असेही त्या म्हणाल्या. ठाणे येथील सामाजिक कार्यकर्त्यां वंदना शिंदे, प्राचार्या सुनंदा तिडके, अॅड. कल्पना त्रिभुवन यांनी परिसंवादात भाग घेतला. जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे यांनी स्वागत केले.