मुंबईमधील बहुतांशी महिला दररोज कामाला जाताना रेल्वे, बस यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर करतात. पण येथेच महिलांना त्यांच्या सुरक्षिततेची खात्री नसते. ४७ टक्के महिलांना आपण बसप्रवासादरम्यान सुरक्षित नसतो, असे सांगितले.
‘अक्षरा’ संस्थेने कॉलेजच्या तरुणांच्या मदतीने जनजागृती करण्यासाठी लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मुंबईमध्ये रोज प्रवासासाठी बस, रेल्वेसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर करणाऱ्या महिलांसोबत २०११ संस्थेने ५,००० महिलांसोबत केलेल्या सर्वेक्षणावरून ४७ टक्के महिलांना भीती वाटत असल्याचे समोर आले. त्या सर्वेक्षणावर आधारित बसचे वाहक आणि चालक यांच्या प्रशिक्षणासाठी ‘त्वरिता’ हे अभियान सुरू केले होते. त्यामध्ये वाहक-चालकांना बसमध्ये होणारे छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. कित्येकदा बसच्या वाहकांसमोर महिला प्रवाशांसोबत छेडछाडीचे प्रकार होत असतात, पण याकडे स्वत: महिला दुर्लक्ष करतात. आवाज उठवत नाहीत.
पर्यायाने वाहकांनाही या प्रकारांमध्ये दुर्लक्ष करावे लागते. या अभियानामध्ये वाहकांनी त्यांना आलेले अनुभव संस्थेच्या व्यक्तींना सांगितले आणि संस्थेकडून भविष्यात असे प्रकार झाल्यास त्यांच्या हातात असलेल्या अधिकारांची माहिती त्यांना देण्यात आली. सध्या बसमध्ये भरती होणाऱ्या नव्या चालक-वाहकांना या विषयाचे प्रशिक्षण संस्थेकडून देण्यात येते. एकदा वाहकांना जागरूक केल्यावर या अभियानाचा पुढचा भाग म्हणून लोकांना या बाबतीत जागरूक करण्यासाठी संस्थेने १६ डिसेंबरला १६ कॉलेजच्या ३१४ मुलांना हाताशी घेऊन प्रवाशांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. अशा प्रसंगी इतर प्रवाशांनीदेखील केवळ बघ्यांची भूमिका न घेता प्रसंगावधान दाखवून महिलेच्या मदतीस येणे गरजेचे असते. या वेळी मुंबईच्या सीएसटी ते चर्चगेट भागातील विविध बसस्थानकांवरील प्रवाशांशी मुलांनी प्रत्यक्ष संवाद साधला, त्यांना या विषयाचे गांभीर्य समजावून सांगितले.