दिल्लीतील निर्भया प्रकरणाने संपूर्ण देशाला अंतर्मुख होण्यास भाग पडले. त्या घटनेचा निषेध प्रत्येकाने आपापल्या परीने नोंदविला. मूळ नाशिकच्या पण सध्या अमेरिकेतील न्यूजर्सी स्थित दीप्ती कुलकर्णी यांनी कुंचल्याच्या माध्यमातून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडली आहे. त्यांच्या या चित्रांचे प्रदर्शन १८ एप्रिल रोजी सायंकाळी चार ते रात्री आठ या कालावधीत येथील देशस्थ ऋग्वेदी संस्थेत होणार आहे.
निर्भया प्रकरणानंतर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रश्नांचे वास्तव प्रकर्षांने जाणवायला लागले. कधी सामूहिक बलात्कार, कधी विनयभंग, एकतर्फी प्रेमातून अ‍ॅसिड फेकणे, कधी कामाच्या ठिकाणी शोषण तर कधी जन्माआधीच स्त्रीभ्रूण हत्या. विविध माध्यमातून महिलांवर सातत्याने अन्याय अत्याचार होत आहे. या प्रश्नांबाबत नागरिकांना माहिती व्हावी, त्याबाबत प्रबोधन व्हावे यासाठी ‘महिलांवरील अत्याचार’ या संकल्पनेवर कुलकर्णी यांनी काम करण्यास सुरुवात केली. यासाठी इंडो-अमेरिका आर्ट कौन्सिलच्या वतीने हे काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. एक वर्षांच्या अथक प्रयत्नात त्यांनी ‘अ‍ॅक्रेलिक ऑन पेपर’च्या माध्यमातून या विषयावर १० कलाकृती साकारल्या आहेत. या शिवाय सांस्कृतिक विषयावर सात कलाकृती तयार केल्या. प्रदर्शनात गणेश कलमकारी या खास कलाकृतीचा नमुनाही उपस्थितांना पाहावयास मिळणार आहे.
याआधी अमेरिका येथे ग्लोबल युनिटीच्या माध्यमातून ऑइल ऑन कॅनव्हासवर आधारित ‘डांसिंरा लेडीज’मध्ये कुलकर्णी यांनी सहभाग नोंदविला. तसेच एटी अ‍ॅण्ड टीने आयोजित केलेल्या ‘व्हिडीओ मेकिंग’ स्पर्धेत त्यांनी पारितोषिक मिळवले. ‘मॉर्डन आर्ट वारली’ला तर परदेशात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच ‘वारली आर्ट ऑन वूड’मध्ये वेस्टर्न इंडियन स्टेट्सचे कोलाज वर्क प्रदर्शित केले आहे. ऋग्वेदी संस्थेच्या कार्यालयात त्यांचे हे चित्रप्रदर्शन सर्वासाठी खुले आहे. रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.