दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. एरवी निर्भयपणे घराबाहेर पडणाऱ्या मुंबईतील महिलाही त्यामुळे धास्तावल्या आहेत. त्यामुळेच आता रात्री एकटय़ाने बाहेर पडाव्या लागणाऱ्या महिला आता महिला टॅक्सीचालकांना प्राधान्य देत आहेत. खाजगी टॅक्सी पुरविणाऱ्या कंपन्यांकडे महिला टॅक्सी चालकांची मागणी गेल्या काही दिवसांमध्ये वाढली आहे.
दिल्लीतील घटनेच्या पाश्र्वभूमीवर प्रसार माध्यमांमध्ये ज्या प्रकारच्या बातम्या आल्या त्यामुळे सर्वत्र महिलांवर अत्याचारच होत असल्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. स्वाभाविकच महिलांच्या मनात भीतीने पक्के बस्तान बसविले आहे. कामानिमित्त मुंबईत महिला रात्री उशिरापर्यंत बाहेर असतात. अनेक जणी शेवटच्या लोकलने अडीच वाजता घरी येतात. त्यांना रिक्षा आणि टॅक्सीचाच पर्याय असतो. पण ज्या टॅक्सीतून आपण प्रवास करतो, त्यात आता आपण सुरक्षित राहू का, असा भीतीयुक्त सवाल या महिलांना पडू लागला आहे. त्यामुळेच आता महिलांनी महिला टॅक्सी चालकांना प्राधान्य दिले आहे. मुंबईत खाजगी टॅक्सी पुरविणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. त्यातील ‘वीरा कॅब्स’ आणि ‘प्रियदर्शनी’ या दोन कंपन्यांकडेच महिला टॅक्सी चालक आहेत. फोन करून त्यांच्याकडील टॅक्सीची नोंदणी करता येते. आम्हाला महिला चालक असणारे वाहन हवे, अशी मागणी करणारे कॉल्स त्यांच्याकडे वाढले आहेत. याबाबत वीरा कॅब्सच्या संचालक प्रीती मेनन यांनी सांगितले की, महिला चालकांची मागणी गेल्या काही दिवसांत वाढली आहे. महिला चालक असल्यास महिला प्रवाशांना एक प्रकारची सुरक्षितता वाटते. आमच्याकडे सध्या २५ महिला चालक आहेत. पण एवढी मागणी वाढली आहे की सर्वानाच महिला चालक देणे शक्य होत नाही. महिला चालक मिळणे फार कठीण असते आणि मुंबईसारख्या शहरात टॅक्सी चालवणे महिला पसंत करत नसल्याचे मेनन यांनी सांगितले. वीरा कॅबची स्वत:ची ‘ड्रायव्हिंग स्कूल’ आहे. तीन महिन्याच्या काळात त्यात महिलांना वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणाबरोबरच आत्मसंरक्षणासाठी ज्युडो आणि कराटेचेही प्रशिक्षण दिले जाते.
 पालक धास्तावले..
मला रात्री कामावरून यायला उशीर झाल्यास मी पुरुषांच्या डब्यातून प्रवास करते. मात्र सध्याच्या वातावरणामुळे पालक धास्तावले आहेत, असे नैना शिंदे या तरुणीने सांगितले. मी कामानिमित्त मैत्रिणींसोबत मुंबईत स्वतंत्र घरात रहात होते. पण आता माझ्या आईवडिलांना काळजी वाटत असल्याने त्यांनी मला पुन्हा त्यांच्याकडे रहायला बोलावले असल्याचे नरिमन पॉइंट येथील ‘साई अ‍ॅडव्हरटाईझिंग’मध्ये काम करणाऱ्या अस्मी नारगोळकर या तरुणीने सांगितले.
सर्वतोपरी मदत करणार- परिवहन विभाग
महिलांनी चालक म्हणून येणे ही काळाची गरज आहे. महिला जर सर्वच क्षेत्रात असतील तर हे क्षेत्रही वाईट नाही, असे मत मुंबईचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विकास पांडकर यांनी व्यक्त केले. महिलांना चालक बनविण्यासाठी सर्वतोपरी सहाकार्य करू, असेही त्यांनी सांगितले. शासनाने याकामी पुढाकार घेतला आणि बँकांनीही सहकार्य केले तर महिला मोठय़ा प्रमाणावर टॅक्सीचालक म्हणून मुंबईच्या रस्त्यावर येऊ शकतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आत्मविश्वास  वाढला
मी गेल्या तीन वर्षांपासून मुंबईत टॅक्सी चालविते. रात्री बेरात्री मी बिनधास्त मुंबईत गाडी चालवते. माझा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे, असे मत वीरा कॅब्समधील महिला टॅक्सी चालक शारदा पटेल यांनी व्यक्त केले आहे. मुंबईत टॅक्सी चालविण्याचा अनुभव खूप चांगला आहे. सुरुवातीला त्रास झाला, पण आता जम बसल्याचे त्यांनी सांगितले. रात्री उशीरा हॉटेलमधून येणाऱ्या महिला, तरुणी शारदा पटेल यांच्या ग्राहक आहेत. संपूर्ण कुटुंबाला कुठे बाहेर जायचे असेल तरी या महिलामला बोलावतात, असे पटेल यांनी सांगितले. महिलांना असुरक्षित जरी वाटत असले तरी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. कुठलाही प्रसंग आला तरी आम्ही त्याला समर्थपणे तोंड देऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी दिला.