जेएनपीटीमधील कामगार विश्वस्तांची मुदत मार्च २०१५ ला संपली असतानाही कामगार विश्वस्तांची नियुक्ती अद्याप केलेली नाही. कामगार विश्वस्तांची नेमणूक करावी, अशी मागणी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे.देशातील प्रमुख ११ बंदरांचे कामकाज पाहण्यासाठी विश्वस्त मंडळे आहेत. या मंडळात कामगारांनी लोकशाही मार्गाने निवडून दिलेले दोन कामगार विश्वस्त असतात. मागील १६ वर्षांपासून जेएनपीटी बंदरात न्हावा-शेवा बंदर कामगार संघटना (अंतर्गत) या सीटू संलग्न संघटनेचे भूषण पाटील हे विश्वस्त म्हणून निवडून येत आहेत. तर दहा वर्षांपासून जेएनपीटी एकता कामगार संघटनेचे दिनेश पाटील विश्वस्त पदावर आहेत. या दोन्ही कामगार नियुक्त विश्वस्तांची मुदत मार्च २०१५ ला संपुष्टात आली आहे. त्यानंतर नव्याने जेएनपीटी विश्वस्त मंडळाचे गठन करण्यात आले असले तरी कामगार विश्वस्ताविनाच जेएनपीटी विश्वस्त मंडळाचा कामकाज सुरू असल्याची माहिती जेएनपीटीचे माजी कामगार विश्वस्त भूषण पाटील यांनी दिली आहे. या संदर्भात नुकतीच आपण दिल्ली येथील वाहतूक भवनात केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कामगार विश्वस्तांची नियुक्ती करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
कामगार विश्वस्त पद रद्द करण्याची भीती
सध्या केंद्र सरकार बंदरातील थोडीफार स्वायत्तता असलेले विश्वस्त मंडळ बरखास्त करून बंदराचे महामंडळात रूपांतर करण्याच्या बेतात आहे. त्यासाठीची कार्यक्रम पत्रिकाही केंद्र सरकारने निश्चित केली होती. या केंद्र सरकारच्या निर्णयाला देशातील बंदर कामगार संघटना व महासंघाने विरोध केला होता. त्यामुळे त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. मात्र केंद्र सरकारकडून प्रमुख बंदर कायद्यात बदल करण्याची शक्यता असून त्यातील कलम ३ नुसार विश्वस्त म्हणून कामगारांकडून नेमण्यात यावेत हे कलम रद्द करून कामगार प्रतिनिधी नाकारण्याचा घाट घातला जात असल्याचीही माहिती भूषण पाटील यांनी दिली आहे.