कुटूंबव्यवस्था आणि आई यांचे महत्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी निफाड येथील कर्मवीर गणपतदादा मोरे महाविद्यालयाने पुणे विद्यापीटाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाच्या सहकार्याने ‘आई कॉलेजच्या दारी’ ही कार्यशाळा आयोजित करून भारतीय परंपरा जपण्याचा प्रयत्न केला.
या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी शकुंतला वाघ यांनी पाश्चिमात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे मोडकळीस येऊ पाहणारी कुटूंब व्यवस्था सावरण्याचे आवाहन केले. संस्कारमय जीवन हाच खरा शृंगार असून विनयशीलता, नम्रता, चारित्र्य ही मूल्ये विद्यार्थ्यांनी सांभाळलीच पाहिजेत. सामाजिक व कौटुंबिक जबाबदारीचे भान ठेवावे असा सल्लाही त्यांनी दिला. आईच्या आदर्शाचे पालन करावे. मुलाचा चेहरा आईच योग्य प्रकारे वाचू शकत असल्याने तिच्याशी खोटे बोलू नका. आईचे महत्व वाढविण्यासाठी सत्य सांभाळा, असा उपदेश करीत त्यांनी आई या विषयावरील कविता सादर केल्या. कार्यशाळेतील दुसऱ्या व्याख्यानात लासलगाव महाविद्यालयाच्या कवयित्री डॉ. प्रतिभा जाधव यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट एकपात्री अभिनयातून मांडला. तिसऱ्या व्याख्यानात मराठी विभागप्रमुख प्रा. माधवराव खालकर यांनी सुजाण पालकत्व या विषयावर मत मांडले. भारतीयांची आदर्श कुटूंब व्यवस्था व त्यातील आईवडिलांचे स्थान स्पष्ट करताना अनेक उदाहरणे देऊन आजही आपण जगासमोर आदर्श कुटूंब व्यवस्था साकारण्यासाठी कटिबध्द झाले पाहिजे, असे आवाहन केले. त्यासाठी पुरूषार्थ समर्पण, त्याग, सेवा, आत्मविश्वास आणि प्रेम यांची अत्यंत गरज असल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी भारताला असलेला ऋषी व कृषी संस्कृतीचा वारसा जतन करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.
     समारोपप्रसंगी उपप्राचार्य एम. व्ही. कुशारे यांनी आईवडिलांचे महत्व मांडले. केंद्र कार्यवाह प्रा. स्मिता पाकधाने यांनी सूत्रसंचालन केले.