कुपोषणाचा सामना करणा-या मेळघाटातील आदिवासींचे पोषण व्हावे व कमीत कमी खर्चात कुटुंबाची गरज भागावी या दृष्टीने परसबाग व कुटुंब शेतीचा पर्याय यशस्वीपणे राबविण्यात आला असून सुमारे तीन हजार शेतक-यांनी या प्रयोगाचा स्वीकार केला आहे. महान ट्रस्टने राबविलेल्या या पर्यावरणपूरक शेतीच्या प्रयोगामुळे मेळघाटातील १७ गावातील कुटुंबांना संतुलित आहार पुरवता येणार असून त्याद्वारे कुपोषणावर काही प्रमाणात मात करता येणार आहे.
१६ ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिन म्हणून गुरुवारी सर्वत्र साजरा केला गेला. संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संघटनेने या वर्षी ‘कुटुंब शेतीची’ संकल्पना या दिनाकरिता निश्चित केली होती. त्या संकल्पनेला पुरक असा प्रयोग महान ट्रस्टने मेळघाटात यशस्वीपणे राबविला आहे. उपलब्ध पाणी, पैसा व मानवी बळाच्या आधारे व कमीत कमी संसाधनांचा वापर करीत घराच्या परिसरातच परसबाग फुलविण्याची ही संकल्पना महानचे डॉ. आशिष सातव व त्यांच्या चमूने साकार करून दाखविली आहे.  आदिवासींचा विश्वास बसावा याकरिता डॉ. सातव यांनी महान संस्थेच्या परिसरात प्रथम अशी बाग फुलवून दाखविली व अत्यंत कमी पाण्यात, डोंगरउताराच्या जमिनीवर भाजीपाला, कडधान्ये, लिंबू, आंबा, केळी व काजू यासारखी पिके घेऊन दाखविली. अर्धा एकराच्या परिसरात असे उत्पादन घेता येते, हे पटवून देण्यासाठी त्यांच्ेा कार्यकर्ते शेतक-यांना भेटले व अशी बाग फुलविण्यात त्यांची मदतही केली. आज धारणी तालुक्यातील १७ गावांमध्ये तीन हजार शेतक-यांनी ही संकल्पना स्वीकार केली आहे व ते प्रत्यक्षपणे राबवित आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने देखील अंगणवाडी, आरोग्य केंद्रे येथे परसबागेचा हा प्रयोग राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
डॉ. सातव यांनी आता हाच प्रयोग मोठय़ा स्तरावर राबविणे सुरू केले आहे व ज्या शेतक-यांकडे १ ते २ एकर शेती आहे अशा शेतक-यांना १५ ते २० प्रकारच्या बियाण्यांचे पाकीट नाममात्र दरात देणे सुरू केले आहे. आदिवासींना कुटुंबाची गरज भागविता येईल, त्याचे योग्य पोषण होईल, शेतीचा उत्पादन खर्च कमी होईल, पिकांवर कीड पडणार नाही व जमिनीचा कस कायम राहील, असे नैसर्गिक बियाणे त्यांना पुरविण्यात आले आहे. ३५० शेतक-यांना जून-जुलै महिन्यात हे मिश्र बियाणे देण्यात आले व त्यातील २०० ते २५० शेतक-यांच्या शेतात चांगले उत्पन्न मिळाले असल्याचे डॉ. सातव यांनी सांगितले. येणा-या काळात तीन हजार शेतक-यांना आम्ही बियाण्यांची पाकिटे देणार आहोत. उच्च पोषण मूल्ये असलेले हे बियाणे स्थानिक स्तरावर तयार केलले  आहेत. कुटुंब शेतीच्या या प्रयोगामुळे विविध प्रकारच्या खाद्य पदार्थाचा समावेश आदिवासींच्या आहारात होणार असून त्यामुळे कुपोषणाच्या प्रश्नावर काही प्रमाणात नियंत्रण आणता येणार आहे. या प्रयोगातून मिळणा-या शेती उत्पादनांमधील पोषणमूल्ये आम्ही तपासत असून त्या दृष्टीने विश्लेषणाला सुरुवात केली असल्याचे, डॉ. सातव यांनी सांगितले.