सतत अवाढव्य, प्रचंड अशा वर्णनाचे काम सुरू असलेल्या मुंबई महानगरात अत्यंत नाजूक, छोटय़ाशा फुलपाखरांनी स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. एवढेच नव्हे तर देशातील इतर कोणत्याही शहरापेक्षा मुंबईत फुलपाखरांच्या सर्वाधिक प्रजाती आढळतात. राज्यातील वन्यजीव मंडळाने ब्लू मॉरमॉनला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला असला तरी मुंबईकरांनी गेल्या वर्षीच कॉमन मॉरमॉनला मिस मुंबई फुलपाखरू म्हणून मान्यता दिली होती.
मुंबईत फुलपाखरांच्या १७० हून अधिक प्रजाती सापडल्या आहेत. हिरवाई जपलेल्या बंगलोरमध्ये १४०, पुण्यात १२०, दिल्लीत ९० तर कोलकात्यात ८० प्रजातींची फुलपाखरे आढळतात. त्यामानाने महानगरांमध्ये फुलपाखरांच्या संख्येत मुंबईने पहिला क्रमांक मिळवलेला आहे. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सामान्य व दुर्मीळ फुलपाखरांवर वनविभागाने पुस्तिकाही छापली आहे. याशिवाय बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या अनेक संशोधकांनी फुलपाखरांवर संशोधन केले आहे. गेल्या वर्षी बीएनएचएसकडून मुंबईत सामान्यरीत्या आढळणाऱ्या फुलपाखरांची स्पर्धाही घेण्यात आली होती. प्लेन टायगर, कॉमन क्रो, कॉमन मॉरमॉन, कॉमन इमिग्रंट आणि टेल्ड जे यांच्यात कॉमन मॉरमॉनने बाजी मारली होती. मात्र फुलपाखरांची नावे मराठीत आढळत नाहीत. यावर फुलपाखरांचे अभ्यास आयझ्ॉक किहिमकर यांचे मत नोंद घेण्यासारखे आहे. देशभरात पक्षी-प्राणी यांच्या स्थानिक नावांमध्ये प्रचंड वैविध्य आहे. फुलपाखरांची नावे मात्र सहसा स्थानिक भाषेत आढळत नाहीत. त्याबाबत आपण फुलपाखरांकडे दुर्लक्ष केले आहे, असे ते सांगतात.
ब्ल्यू मॉरमॉन हे मुंबईत अनेक ठिकाणी दिसते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी एवढेच काय शहरातील गर्दीच्या ठिकाणीही पाहायला मिळते, असे वनअभ्यासक आनंद पेंढारकर म्हणाले. पश्चिम घाटात आढळत असलेले हे फुलपाखरू पठारावर मात्र दिसत नाही, ब्ल्यू मॉरमॉनला राज्य फुलपाखरू केल्याने या लहान जीवांकडे सर्वसामान्यांचे लक्ष वेधले गेले, असेही त्यांनी सांगितले.

रंगांची दुनिया
चमकदार रंग हे फुलपाखरांचे वैशिष्टय़. मात्र हे रंग त्याच्या शरीरात नसतात. पंखावर असलेल्या खवल्यासारख्या जागेत रंगाच्या पेशी असतात. हे रंग त्यांना जोडीदार शोधायला मदत करतात. तसेच त्यांना पटकन लपायलाही मदत करतात. काही फुलपाखरे या रंगांचा उपयोग घाबरवण्यासाठीही करतात.
फुलपाखरांची संवेदनशीलता
हवेच्या दहा लाख रेणूंमध्ये गंधांचे तीन रेणूही एका फुलपाखराला दुसऱ्याचा माग काढण्यास पुरेसे असतात. माणसाला मात्र एखादा गंध येण्यासाठी दहा लाख रेणूंमध्ये १४ हजार गंधरेणू असणे आवश्यक असते. घाणेंद्रिय तीव्र असलेला स्नीफर डॉगही दहा लाखांत तीनशे गंधरेणू असल्याशिवास वास ओळखू शकत नाहीत. अर्थात फुलपाखरांची हीच संवेदनशीलता त्यांना प्रदूषणात टिकाव लागण्यासाठी हानिकारक ठरते.