दहशतवाद्यांच्या ‘हिट लिस्ट’ वर असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या सुरक्षिततेचा भाग म्हणून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने एक जानेवारीपासून भाविकांसाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली असून भाविकांना श्रीफळासह पूजेचे साहित्य सभामंडप तसेच गर्भगृहात नेण्यास मनाई करण्यात आली आहे.
१२ ज्योतिर्लिगांपैकी एक म्हणून त्र्यंबकेश्वर देवस्थान प्रसिध्द आहे. देशासह विदेशातूनही वर्षभर येथे भाविक येत असतात. दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत असताना ट्रस्टपुढे काही समस्याही उद्भवू लागल्या. देवस्थान परिसरातील अस्वच्छतेवर नागरिकांकडून ओरड सुरू असताना ट्रस्टने आता सुरक्षिततेचा मुद्दा हाती घेतला आहे. देशभरातील काही महत्वपूर्ण देवस्थाने दहशतवाद्यांचे लक्ष्य असून त्यापैकी त्र्यंबकेश्वर हे एक आहे. त्यामुळे देवस्थानची सुरक्षितता हा विषय कायमच चर्चेत राहिला आहे. देवस्थानच्या सुरक्षिततेसंदर्भात ट्रस्टने अधिक काळजी घेण्याची मागणी वारंवार केली जात होती. पोलीस प्रशासनाकडूनही देवस्थानच्या सुरक्षिततेचा नियमित आढावा घेण्यात येतो. दररोज हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असल्याने देवस्थानासह भाविकांची सुरक्षितताही ऐरणीवर आहे. त्यातच पुढील वर्षांत सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे. त्यामुळे भाविकांच्या गर्दीत नेहमीपेक्षा कित्येक पटीने वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत देवस्थानच्या सुरक्षिततेवर अधिक ध्यान देण्याची आवश्यकता लक्षात घेत देवस्थान ट्रस्टच्या वतीने काही र्निबध आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस प्रशासन तसेच दहशतवादी विरोधी पथक यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या आधारे देवस्थानने नवीन नियम तयार केले असून त्याची अंमलबजावणी एक जानेवारीपासून करण्यात येणार आहे.
नवीन नियमांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सभामंडपात, गर्भगृहात श्रीफळ नेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे कोणालाही मंदिरात श्रीफळ नेता येणार नाही. भाविकांनी आणलेले श्रीफळ हे मंदिराच्या प्रवेश व्दाराजवळ ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांकडून जमा करून घेतले जाणार आहे. भाविकांकडून प्लास्टिकच्या पिशव्यांमधून प्रसाद किंवा पूजेचे साहित्य आणण्यात येते. पूजा झाल्यानंतर या प्लास्टिकच्या पिशव्या त्याच ठिकाणी टाकल्या जात असल्याने अस्वच्छतेत भर पडण्यासह पर्यावरण हानीस ही गोष्ट पूरक ठरत असल्याचे ट्रस्टच्या लक्षात आल्याने प्लास्टिक पिशव्या, थर्मोकोलचे द्रोण अथवा तत्सम वस्तु भाविकांना मंदिरात आणता येणार नाहीत. भाविकांनी आणलेली फुले व प्रसाद प्रवेश द्वाराजवळ जमा करण्यात येणार आहे. भाविकांनी आणलेला प्रसाद, फुले, बिल्वपत्र अथवा देवास अर्पण करावयाच्या इतर वस्तु त्र्यंबकेश्वर देवस्थान प्रशासनाच्या वतीने रोजचे रोज देवास अर्पण करण्यात येतील, असे ट्रस्टच्या वतीने कळविण्यात आले आहे.
भाविकांनी देवस्थानची सुरक्षितता, स्वच्छता आणि पर्यावरण वृध्दीसाठी सहकार्य करण्याचे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.