कल्याण डोंबिवली महापालिकेतील पाणीपुरवठा, कर आणि संगणक विभागातील कर्मचाऱ्यांच्या चुकांमुळे २२ हजार नागरिकांना चुकीची पाणी बिले पाठविण्यात आली आहेत. याविषयी सर्वपक्षीय नगरसेवकांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली असता ही चुकीची बिले रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिका हद्दीतील चाळी, झोपडपट्टी, तसेच काही सोसायटय़ांतील रहिवाशांना मागील थकबाकी दाखविणारी पाणी बिले पाठविण्यात आली होती. ज्या रहिवाशांना सहा महिन्यांनी ५०० ते ६०० रुपयांची पाणी बिले येतात, त्यांना १५ हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत बिले पाठविण्यात आली आहेत. या विषयावर नगरसेवक अरविंद पोटे, जीवनदास कटारिया, नरेंद्र गुप्ते यांनी सभा तहकुबी मांडली होती. सर्वपक्षीय नगरसेवकांनी अडीच तास चुकीची पाणी बिले विषयावर चर्चा केली. सर्व चुकीची पाणी देयके रद्द करा. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. प्रभारी आयुक्त संजय घरत यांनी या बिलांविषयी चूक झाल्याची कबुली देत दिलगिरी व्यक्त केली. तसेच नागरिकांना सुधारित बिले पाठविण्यात येतील, असेही स्पष्ट केले. चालू आर्थिक वर्षांत पाणी बिलापोटी ६० कोटींचे येणे आहे. आतापर्यंत फक्त ५ कोटी वसूल झाले आहेत. नागरिकांनी बिले भरण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.