जुन्या वैमन्यस्यावरून जरीपटक्यातील दयानंद पार्क येथे गुरुवारी मध्यरात्री एका तरुणाची हत्या करण्यात आली. यानंतर संतप्त जमावाने घोषणा देत दगडफेक केली. संतप्त नागरिकांना शांत करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यात पाचजण जखमी झाले. ज्या तरुणाची हत्या झाली त्याच्या घरात शिरून कुटुंबातील सदस्यांनाच पोलिसांनी मारहाण केली. त्यामुळे पोलिसांबद्दल प्रचंड रोष निर्माण झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी हत्या झालेल्या तरुणाच्या पार्थिवावर पोलिसांच्या चोख बंदोबस्तात नारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.  
पुरुषोत्तम उर्फ परशु मनोहरलाल बत्रा (३२), रा. बाबा हरदास धर्मशाळेजवळ, जरिपटका, असे मृत तरुणाचे नाव आहे. परशुचे काही दिवसांपूर्वी जरिपटकाच्या शेजारी असलेल्या व मिसाळ ले-आऊट येथे राहणाऱ्या लॉझर्स उर्फ आरिफ विनोद इमॅन्युअल याच्यासोबत शत्रुत्व निर्माण झाले होते. हे शत्रुत्व मिटवण्यासाठी गुरुवारी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास आरिफने त्याला जरीपटकातील दयानंद पार्क येथे बोलावले. त्यानुसार परशु हा त्याचा मित्र किशोर जग्यासी याला तेथे घेऊन गेला. यावेळी तेथे आरिफसह पाच-सहा जण आधीच तयार होते. यावेळी परशु व आरिफमध्ये जोरदार भांडण झाले. धमकीमुळे किशोर जग्यासी हा पळून गेला. यानंतर या भांडणात आरिफने परशुच्या डोक्यावर दगडाचा प्रहार केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर आरोपींनी त्याच्या शरीरावर लाथा बुक्याने मारहाण करून त्याचा जीव घेतला.
पळत गेलेल्या किशोर जग्यासीने ही माहिती बाबा हरदास धर्मशाळेजवळील लोकांना सांगितली. आरोपी कोण होते, याची माहितीही त्याने दिली. परशुचा मोठा भाऊ व परिसरातील काही तरुण घटनास्थळी आले. त्यांनी लगेच परशुला मेयो रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही माहिती कळतात जरीपटकामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. जवळपास शंभर ते दीडशे संतप्त नागरिकांनी मिसाळ ले-आऊट येथे जाऊन आरोपी आरिफच्या घरावर दगडफेक केली तसेच त्याची मोपेड जाळून टाकली. तसेच त्याचे घर जाळण्याचाही प्रयत्न केला. यावेळी जरिपटका, पाचपवाली व धंतोली पोलीस घटनास्थळी आले. राखीव दलाच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले.
या घटनेने लोकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. रात्री दोन वाजता जवळपास सातशे नागरिक वसंतशाह चौकात गोळा झाले. या घटनेचा तीव्र निषेध करू लागले. याचवेळी काहींनी पोलीस व्हॅनवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनीही प्रत्युत्तर म्हणून नागरिकांवर लाठीहल्ला केला. त्यात काही नागरिक जबर जखमी झाले. दोघा-तिघांचे डोके फुटले. यावेळी पोलिसांनी घरात शिरून महिला, पुरुष व लहान बालकांनाही मारहाण केली. त्यामुळे पोलिसांविषयी आणखी रोष निर्माण झाला.
दरम्यान, या घटनेनंतर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला. आज दुपारनंतर उत्तरीय तपासणीनंतर परशुचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. पोलिसांच्या बंदोबस्तात सायंकाळी ५.०० वाजता नारा स्मशानभूमीत परशुच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला दोन हजार नागरिक सहभागी झाले होते. या घटनेचा निषेध म्हणून जरिपटक्यातील सिंधी बांधवांनी  प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.
आरोपी आरिफने शुक्रवारी सकाळीसच जरीपटका पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आरिफ हा परिसरात कुख्यात असून तो खंडणी वसूल करण्याचे काम करतो. त्याच्या दहशतीमुळे परिसरातील व्यावसायिक त्याला खंडणी देत होते. त्याच्यावर जरिपटका पोलीस ठाण्यात अनेक दाखल आहेत. परंतु पोलीस त्याला हात लावत नव्हते. त्याचा वेळीच बंदोबस्त केला असता तर, आजची ही घटना घडली नसती, असे आता या परिसरात बोलू लागले आहे. तर परशु हा हवाला व्यापारी होता. असे असले तरी तो सामाजिक कार्यात अग्रेसर राहायचा. त्यामुळे संपूर्ण जरिपटक्यात त्याच्याविषयी सहानुभूती होती. त्याने निवडणुकीच्या आधी सिंधी समाजातील तरुणांची ‘युवा संघर्ष वाहिनी’ ही बिगर राजकीय संघटना स्थापन करण्याचा निर्णयही घेतला होता. हे काम अंतिम टप्प्यात आले होते. या संघटनेत जवळपास पाचशे तरुण होते. त्यांच्या नावाची यादीही परशुकडे होती. त्याच्या खुनामागे राजकीय पाश्र्वभूमीतर नाही ना, याचा तपासही पोलीस करीत आहेत. दरम्यान निवडणूक निकालानंतर हे प्रकरण पेटणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.