देश महासत्तेकडे वाटचाल करत असला तरी खेडय़ाचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाचा फायदा ग्रामीण भागाच्या विकासासाठी होणे आवश्यक आहे. ग्रामविकासात संशोधनाला अजूनही मोठा वाव असून, तरुणांनी नवनिर्मितीवर भर द्यायला हवा. लोकशक्ती संघटित झाल्यानेच लोकशाही प्रभावी ठरत असल्याचे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती व्याख्यानात ‘सर्वसमावेशक नवोन्मेषातून ग्रामीण विकासाला चालना’ या विषयावर ते बोलत होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात अध्यक्षस्थानी होते. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे, आमदार डॉ. सुधीर तांबे, थोरात कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे, आर. बी. सोनवणे आदी उपस्थित होते. डॉ. माशेलकर म्हणाले, की भाऊसाहेब थोरात यांनी लोकशाहीच्या माध्यमातून उभारलेल्या संस्था राज्यात आदर्शवत आहेत. ग्रामीण विकास हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास राहिल्याने पुढील पिढय़ांसाठी तो सतत प्रेरणादायी ठरेल. माहिती तंत्रज्ञानाचे जाळे खूप वाढले अशीच प्रगती आरोग्य, कृषी, शिक्षण क्षेत्रात होणे गरजेचे आहे. देशात झालेले संशोधन ग्रामीण भागातील गोरगरिबांपर्यंत पोहोचलेच नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षणाचा लाभ घेत नवीन तंत्रज्ञान आपल्या मातीपर्यंत पोहोचवावे. थोरात यांनी तरुण पिढी देशाची भविष्यातील खरी संपत्ती आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने संशोधन करून आपली गुणवत्ता वाढवावी, असे आवाहन केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन तर केशवराव जाधव यांनी आभार मानले.