लोकसभा निवडणुकांच्या मतदानाचा दिवस जसा जवळ येतोय तसा उमेदवारांच्या प्रचाराचा धुरळा अधिक गडद होत चालला आहे. मात्र त्याच जोडीने जे मतदान करीत नाहीत, त्यांनी मोठय़ा संख्येने मतदान करावे यासाठी तरुणाईने जागृती मोहीम सुरू केली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ या परिसरातील विविध महाविद्यालयीन युवक आणि त्यांच्या बरोबरीने महाविद्यालयाचे एनएसएस विभाग या प्रचार मोहिमेत सहभागी होत आहेत. घरोघरी जाऊन पत्रक वाटत जागृती, आपापल्या परिक्षेत्रातील उमेदवारांची माहिती देणारे परिसंवाद आयोजित करण्याबरोबरच सोशल माध्यमांच्या मदतीने ‘मतदानाला चला’ असे संदेश ही तरुण पिढी देत आहे.
ठाण्यातील मतदारसंघातील मतदारांची संख्या कमालीची वाढली असून, प्रत्यक्षात मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांची संख्या मात्र कमालीची कमी असते. त्यामुळेच ठाणे, कल्याण, भिवंडी या मतदारसंघातली मतदारांची टक्केवारी सरासरी ४० ते ५० टक्क्य़ांच्या आसपास रेंगाळणारी असते. मतदानाचा हा टक्का वाढवण्यासाठी ठाणे, कल्याण-डोंबिवलीतल्या युवकांनी, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन गेल्या दोन महिन्यांपासून विविध प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. ठाण्यातील नववर्ष स्वागतयात्रेच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या मदतीने सुमारे ५० हजार मतदारांपर्यंत पोहोचून मतदान करण्याचे आवाहन ठाण्यात करण्यात आले होते. त्याचबरोबर कल्यामधील यंग इंडिया ही तरुणांची संस्था गेल्या दोन महिन्यांपासून मतदार जागृती करत आहेत. भिवंडी मतदारसंघातील उमेदवारांची तौलनिक माहिती देणारा एक तरुणांचा परिसंवाद या युवकांनी आयोजित केला होता. त्याचबरोबर तरुण वर्गाच्या खासदारांकडून आणि येणाऱ्या सरकारकडून असलेल्या अपेक्षांचा वेध या कार्यक्रमातून घेण्यात आला. या परिसंवादामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचार, गुन्हेगारी, महागाई आणि रोजगार या प्रमुख समस्यांवरील आपले मत प्रदर्शित केले. मतदान केल्याने परिस्थिती बदलू शकते, असा संदेश या परिसंवादातून देण्यात आला, अशी माहिती यंग इंडियाचा तरुण कार्यकर्ता हर्षद कुलकर्णी याने दिली. ठाण्यातील कंझ्युमर प्रोडक्शन सव्‍‌र्हिस कौन्सिलच्या वतीने गुरुवारी जनजागृती रॅली काढून मतदान जागृती करण्यात आली असून, सोशल माध्यमातून मतदारांना मतदानासाठी उद्युक्त करण्याता प्रयत्न केला जात आहे.
तरुणांमध्ये प्रचंड आकर्षण असून मतदानाच्या दिवशी सुट्टी घेण्यापेक्षा मतदान करा, असा संदेश प्रत्येक तरुणाच्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक प्रोफाइलवर झळकू लागला आहे. कल्याण-डोंबिवली शहरातील १८ कॉलेजेसच्या एनएसएस विभाग मतदार जागृतीसाठी पुढे आले असून, पथनाटय़ाच्या आधारे मतदार जागृती करण्याता प्रयत्न ही मुले करत असल्याची माहिती बिर्ला कॉलेजचे एनएसएस विभागाचे प्रा. नितीन बर्वे यांनी दिली.