दिवाळी सणाचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी तरुणाई मोठय़ा संख्येने फडके मार्गावर सकाळपासून अवतरली होती. आपल्या मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होती. श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी अनेकांनी मंदिरात रांगा लावल्या होत्या. या सगळ्या उत्साहात मराठी मालिकांमधील अभिनेते, अभिनेत्रींनी उपस्थिती दर्शविल्याने डोंबिवलीकरांना यंदाही सेलीब्रेटींसोबत दिवाळीची पहिली पहाट साजरी करता आली.
गेल्या काही वर्षांपासून तरुणाईला व्हॉट्सअ‍ॅप ज्वर चढू लागला असला तरी फडके मार्गावर यंदा स्वत:चे मोबाइल फोटो काढण्याची जणू स्पर्धाच सुरू होती. शुभेच्छांचे, गटागटाची छायाचित्रे काढून ती व्हॉट्सअ‍ॅपवर टाकण्याची स्पर्धा सुरू होती. अनेक दिवसांपासून न भेटलेले तरुण मित्र एकमेकांना आलिंगन देत होते. नोकरी, व्यवसायाच्या चौकशीबरोबरच बाजारातील अत्याधुनिक मोबाइल कोणता आणि त्यामधील सुविधा या विषयीच्या चर्चाना सर्वाधिक प्राधान्य दिसत होते.
अनेक कुटुंबीय घरातील ज्येष्ठांसह फडके रस्त्यावरील जल्लोष पाहण्यासाठी आले होते. तरुणाईचा जल्लोष असल्याने ज्येष्ठ मंडळी रस्त्याची किनार पकडत श्री गणेशाच्या दर्शनाला जात असतानाचे चित्र होते. विवाहाच्या बोहल्यावर चढणारी, नव्यानेच लग्न झालेली दाम्पत्य या उत्सवात सहभागी झाली होती. उत्साहाचा हा ओहोळ वाहत असतानाच ‘का रे दुरावा, ‘जुळून येती रेशीम गाठी’मधील कलाकार फडके रस्त्यावर आले आणि  उत्साह आणखी संचारला. कलाकारांशी संवाद साधण्यासाठी, त्यांच्या सह्य़ा घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली. अनेकांनी सोबत दिवाळी फराळ आणला होता. हशा, टाळ्यांचा गजर करीत गटागटाने फराळावर हात मारण्याचे काम सुरू होते. उन्हं चढू लागली तशी फडके रस्त्यावरील गर्दी ओसरू लागली.