सातपूर-अंबड रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. संबंधित युवक रस्ता ओलांडत असताना वाहनाने त्यास उडविले.
शहरातील रस्त्यांवर वेगावर नियंत्रण ठेवले जात नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यात कित्येकांना प्राण गमवावे लागले.
मंगळवारी सायंकाळी सातपूर-अंबड रस्त्यावर पुन्हा त्याच स्वरूपाच्या अपघाताची पुनरावृत्ती झाली. व्हिक्टर गॅस्केट कंपनीसमोर किरण रूपेश लोखंडे (२४) हा युवक रस्ता ओलांडत होता. या वेळी एका वाहनाने त्यास जोरदार धडक दिली. अपघातानंतर संबंधित वाहन चालक पसार झाला. आसपासच्या नागरिकांनी धाव घेऊन गंभीर जखमी अवस्थेतील किरणला रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्याचे निधन झाले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.