नैराश्याच्या गर्तेत बुडालेल्या तरुणांबरोबरच उरण परिसरातील अल्पवयीन मुलेही नशेच्या आहारी जाऊ लागली असून शहरातील उच्च वर्गाबरोबरच झोपडपट्टीत गरिबीत वाढणाऱ्या मुलांमध्ये नशेबाजी वाढली आहे. उरण शहरात अनेक ठिकाणी गांजा, चरससारखे नशेचे पदार्थ सहजपणे उपलब्ध होत आहेत. त्याचप्रमाणे कमी दरातही अनेक नशेचे पदार्थ मिळत असल्याने रात्रीच्या वेळी तसेच दिवसा निर्जन ठिकाणी, पडीक जुन्या इमारती, घरांमध्ये तसेच सार्वजनिक बागेत आणि शहरातील शौचालयात नशेबाजांचा वावर सुरू असून उरण शहरासह ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलांच्या नशेबाजीत वाढ झाल्याने तरुणाईबरोबरच अनेक कुटुंबेही धोक्यात आली आहेत.
उरण परिसरातील तरुण पिढी नशेच्या आहारी जात असल्याचे विदारक चित्र दिसू लागले आहे. यामध्ये अगदी २५ वर्षांच्या तरुणापासून ते १० वर्षांच्या अल्पवयीन मुलाचाही सहभाग वाढला आहे. यामधील तरुण त्याच्या आर्थिक कुवतीनुसार नशेच्या वेगवेगळ्या प्रकाराकडे वळू लागला आहे. सध्या १० रुपयांनाही गांजाची पुडी सहज मिळत आहे. तर अनेकांना हजारो रुपयांचे कोकेनही मिळते. त्यामुळे उरण परिसरात गांजाची तस्करी होत असल्याने गांजासारख्या अमली पदार्थाची उरण परिसरात विक्री होत असल्याचे उघड झाले आहे.
तरुणाई या अमली पदार्थाच्या विळख्यात सापडण्याची मुख्य कारणे म्हणजे शैक्षणिक अपयश, प्रेमभंग, कर्जबाजारीपणा आदी असल्याचे म्हटले जाते. तर अल्पवयीन मुले मोठय़ांचे अनुकरण करण्याच्या उद्देशाने नशेच्या या चक्रव्यूहात गुरफटू लागली आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारीतही वाढ झाली असल्याचे चित्र आहे. आपली अमली पदार्थाची नशा पूर्ण करण्यासाठी घरातील चोरीच्या घटनांत वाढ झालेली आहे. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी चोऱ्या केल्या जात आहेत. तर सध्या डोकेदुखी, सर्दीच्या गोळ्या शीतपेयात टाकून नशा करणे, शिळ्या पावाला आयोडेक्स लावून नशा करणे, खोकल्याचे औषध पिऊन सिगारेट ओढणेआदींचाही वापर केला जात आहे. अनेक मेडिकलमधून याला बंदी असताना जादा पैसे देतो मला औषध द्या अशा मागण्या या नशेबाजांकडून केल्या जात आहेत.
या संदर्भात उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी पोलीस अमली पदार्थाच्या तस्करीवर डोळा ठेवून असल्याचे मत व्यक्त केले आहे. मात्र औषधांचा वापर करून केल्या जाणाऱ्या नशेवर पोलीस काय करू शकत नाहीत. यासाठी अन्न व औषध पुरवठा विभागाने औषध विक्रेत्यांवर कडक नियंत्रण ठेवल्यास नियंत्रण येऊ शकते. तसेच तरुणांमध्ये नशा व अमली पदार्थविरोधात पोलिसांकडून जनजागृती केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.