तंत्रज्ञान अवतीभोवती घेऊन वावरणाऱ्या तरुण पिढीला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विशेष अपेक्षा असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत प्रशासन गतिमान करणे व त्या आधारे अपेक्षित विकास त्यांनी घडवून आणावा, अशी तरुण पिढीची भावना आहे. अगदी खेडोपाडी मोबाईल फोनवर इंटरनेट  वापरणाऱ्या तरुणाला त्या माध्यमातून त्यांचा कामे लवकर व कमी कष्टात व्हावी असे वाटल्यास वावगे ठरणार नाही. इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळे अर्ज लवकर भरले जावेत, शिष्यवृत्तींची कामे लवकर व्हावीत, विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात माराव्या लागणा-या खेपा कमी होऊन ही कामे ऑन लाईन व्हावी, विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी करावे लागणारे ई-मॅपिंग असो की तरुण शेतक-यांपर्यंत आधुनिक सुविधा नेणे असो, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर फडणवीसांच्या कारकीर्दीत व्हावा अशी अपेक्षा राहणार आहे. दीर्घ काळापासून राजकारण करणाऱ्या फडणवीसांची स्वत:ची प्रतिमा स्वच्छ असल्याने ते स्वच्छ तरीही कार्यक्षम प्रशासन देतील अशी अपेक्षा तरुणांना आहे. स्वत:च्या वेबसाईटच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, चर्चा करण्याच्या त्यांच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला  व असा प्रतिसाद देणारा वर्ग हा प्रामुख्याने तरुण व नवमतदार होता.  आपल्यातीलच वाटणारा, विकासाची भाषा बोलणारा, तंत्रज्ञानाचा वापर करणारा नेता नव्या मतदाराला आवडतो हे मोदींच्या उदाहरणावरुन लोकसभेच्या वेळी लक्षात आले होते. तीच बाब  फडणवीसांना लागू होते. तंत्रज्ञानाचा व आधुनिक साधनांचा उपयोग करीत स्वच्छ प्रशासन देणे व नागपूर- विदर्भाचा विकास घडवणे या अपेक्षा विदर्भातील तरुण मतदार नव्या मुख्यमंत्र्याकडून बाळगून आहे.