मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून पाच-सहा गुंडांनी एका तरुणाची शस्त्राने सपासप वार घालून निर्घृण हत्या केली. सुदामनगरीत बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली.
अमोल संजय नेवारे (रा. सुदामनगरी, हिलटॉप) हे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. हिलटॉपवर एकता गणेशोत्सव मंडळातर्फे गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. काल रात्री साडेआठ वाजता या मूर्तीची विसर्जन मिरवणूक निघाली. त्यात कानठळ्या बसविणाऱ्या आवाजात डीजे वाजत होता. अमोल व इतर अनेक कार्यकर्ते बेधुंद नाचत होते. नाचताना एकमेकांना धक्का लागत असल्याने त्यांच्यात अनेकदा भांडण झाले. हिलटॉप परिसरात फिरून रात्री पावणेअकरा वाजताच्या सुमारास मिरवणूक रामनगरकडे गेली. तेथून दारू पिण्याच्या बहाण्याने अमोलसह काहीजण निघून गेले. कुठेतरी पुन्हा मद्यप्राशन केल्यानंतर हिलटॉप परिसरातील एका वळणाजवळ अंधारात पाच-सहाजणांनी अमोलला घेरले आणि त्याच्यावर शस्त्रांनी सपासप वार केले. अमोल रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्याचे दिसल्यानंतर मारेकरी पळून गेले.
काही वेळानंतर तेथून आणखी एक विसर्जन मिरवणूक जात असताना त्यातील कुणाला तरी रक्ताच्या थारोळ्यात कुणीतरी पडल्याचे दिसले. आरडाओरड झाली. तेथे बघ्यांची गर्दी झाली. हे समजल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कातकडे यांच्यासह अंबाझरी पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांनी लगेचच अमोलला  दंदे रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. एव्हाना तेथपर्यंत मिरवणूक पोहोचली होती. हा मृतदेह अमोलचा असल्याचे त्याच्या भावाने ओळखले. मिरवणुकीत नाचणाऱ्यांनाही अमोलचा खून झाल्याचे समजले होते. मिरवणूक रविनगरात थांबवून कार्यकत्यार्ंनी रुग्णालयात धाव घेतली. तेथेही डीजे वाजत असल्याने पोलिसांनी तो बंद करायला लावला. अमोलच्या खुनाने आधीच संतापलेले कार्यकर्ते त्यामुळे अधिकच संतापले. तेथे आणि सुदामनगरीत तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने त्या परिसरात मोठा पोलीस ताफा तैनात केला. अमोलच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सिद्धार्थ खंडारे (रा. सुदामनगरी) व त्याच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध सुरू केला. गुरुवारी दुपापर्यंत आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले नव्हते.