दसरा मार्गावरील गवळीपुऱ्यात मंगळवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेऊन तासाभरात अटक केली. रात्री उशिरा जखमीचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
जुन्या वैमनस्यातून एका तरुणाचा खून झाल्याची घटना दसरा मार्गावरील गवळीपुऱ्यात मंगळवारी रात्री सव्वासात वाजताच्या सुमारास घडली. शैलेंद्र बाळकृष्ण जुनघरे (रा. गवळीपुरा दसरा रोड) हे खून झालेल्याचे तर सुरेश साधू घोंगरे (रा. गोंधळीपुरा दसरा रोड) हे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शैलेंद्र हा घरासमोर उभा होता. आरोपी सुरेश तेथे गेला. तेथे आल्यानंतर त्या दोघांची बाचाबाची झाली. आरोपी सुरेशने त्याच्यावर चाकूचे वार केले आणि पळून गेला. हे दिसताच जवळच बोलत उभे असलेले शैलेंद्रचे शेजारी धावले. त्यांनी पोलिसांना कळवून जखमी शैलेंद्रला मेडिकल रुग्णालयात दाखल केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण जगताप यांच्यासह कोतवाली पोलीस तसेच पोलीस उपायुक्त सुनील कोल्हे, सहायक पोलीस आयुक्त निलेश राऊत, पोलीस निरीक्षक किशोर सुपारे, सहायक निरीक्षक धीरज चौधरी, हवालदार मनोज जोशी यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक तेथे पोहोचले. पोलिसांनी विचारपूस केली. आरोपीचे वर्णन घेऊन गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. विविध ठिकाणांहून माहिती मिळवून या पथकाने मॉडेल मिल चौक गाठला. तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी सुरेशला पकडून कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केले. मेडिकलमध्ये उपचार सुरू असताना शैलेंद्रचा रात्री उशिरा मृत्यू झाला. सुरेशच्या मुलाने काही दिवसांपूर्वी विषप्राशन करून आत्महत्या केली. प्रेमभंगातून त्याने आत्महत्या केल्याचे व ती तरुणी शैलेंद्रची परिचित होती. त्यावरून शैलेंद्र व सुरेशचे अनेकदा भांडण झाले होते. त्यातून शैलेंद्रने सुरेशला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे सुरेशने त्याला संपविल्याचे पोलिसांना समजले.